माहेश्वरी समाजाचा शेवगावात मूकमोर्चा; दोघांच्या हत्येच्या निषेध | पुढारी

माहेश्वरी समाजाचा शेवगावात मूकमोर्चा; दोघांच्या हत्येच्या निषेध

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : शहरातील दरोडा व खून प्रकरणाचा तपास त्वरित करून आरोपींना अटक न केल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सकल माहेश्वरी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. या घटनेचा निषेध करुन त्याचा उच्चस्तरीय तपास यंत्रणेमार्फत करावा, यासाठी सकल माहेश्वरी समाज, व्यापारी, विविध पक्ष व ग्रामस्थांनी शनिवारी (दि.24) तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढला. हा मूक मोर्चा शहरातील बालाजी मंदिर, शिवाजी चौक, क्रांती चौक, आंबेडकर चौक मार्गे तहसूल कार्यालयावर नेण्यात आला. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.

शहरात मारवाडगल्लीत राहणारे बलदवा यांच्या घरावर दि.23 रोजी पहाटे 3 वाजता दरोडेखोरांनी दरोडा टाकून दागिने चोरून नेले. या दुर्घटनेत आडत व्यापारी दगडू उर्फ गोपीकिसन बलदवा व त्यांच्या भावजय पुष्पा बलदवा यांचा मृत्यू झाला. तर दगडू बलदवा यांच्या पत्नी सुनिता बलदवा या जखमी झाल्या. त्याचे तीव्र पडसाद शहर व तालुक्यात उमटले असून, शुक्रवारी शेवगाव शहरील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. काल (दि.24) मूक मोर्चा काढण्यात आला.

मोर्चात आमदार मोनिका राजळे, आमदार सुरेश जेढलिया, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, माजी सभापती क्षीतिज घुले, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, अरूण लांडे, काकासाहेब नरवडे, संजय कोळगे, बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, उपसभापती गणेश खंबरे, तुषार पुरनाळे, अमोल सागडे, बापूसाहेब गवळी, शरद सोनवणे, दत्ता फुंदे, जगदीश धुत यांच्यासह माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष मनेष बाहेती, नितीन मालानी, डॉ. पुरुषोत्तम बिहाणी, राजाभाऊ लड्डा, दिलीप मुंदडा, शाम धूत, विजय बलदवा, विजय दरक, श्रीकांत लड्डा, मंजूश्री धूत, सुरेखा लाहोटी सहभागी झाले होते.

यावेळी आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रशासनाशी संपर्क साधून फास्टट्रॅक तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासन आणि जनतेशी सुसंवाद साधण्याची जबाबदारी माझी असून, अशा अडीअडचणीच्या प्रसंगाचा सर्वजण मिळून सामना करू.

अ‍ॅड. प्रताप ढाकणे म्हणाले, शेवगाव व पाथर्डी तालुक्यांत सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी पाथर्डी येथील व्यापारी, तर नुकतेच शेवगाव शहरातील दोन जणांचा भरवस्तीत खून झाला आहे. अशा दुर्दैवी घटना घटल्यानंतर दोन दिवस वातावरण तप्त होते. नंतर मात्र सर्वजण आपआपल्या कामात व्यस्त राहतात. दोन्ही तालुक्यातील अवैध धंद्यांबाबत पोलिसांना संपूर्ण माहिती आहे. त्यांनी ते बंद करावेत. तसेच सर्वपक्षीय राजकारण्यांनी अशा प्रवृत्तींना थारा देऊ नये.

यावेळी आमदार सुरेश जेढलिया, क्षीतिज घुले, माहेश्वरी समाजाचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी, महिला जिल्हाध्यक्ष किरण डागा, उमेश मुंदडा, प्रदेश सचिव सत्यनारायण सारडा, राधिका बलदवा आदींची भाषणे झाली. नायब तहसीलदार रवींद्र सानप, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, प्रशिक्षणार्थी बी.चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

हेही वाचा

परंपरा : देव तेथें चि जाणावा

पुणे : अकरावीच्या पहिल्या फेरीत 24 हजारांवर प्रवेश

केखले येथे गव्यांच्या कळपाने 50 एकर उसाचा पाडला फडशा

Back to top button