रूईछत्तीशी : सोनेरी रंगाचे सुतारपक्षी नामशेष; पाण्यासाठी सीना नदी पट्ट्यातून उजनी धरणाकडे स्थलांतर | पुढारी

रूईछत्तीशी : सोनेरी रंगाचे सुतारपक्षी नामशेष; पाण्यासाठी सीना नदी पट्ट्यातून उजनी धरणाकडे स्थलांतर

रूईछत्तीशी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : प्रदूषण वाढत असल्याने पक्ष्यांचे अस्तित्व नष्ट होत चालले आहे. गर्भगिरीच्या डोंगररांगेत नगरच्या पठारावर सीना नदी उगम पावते. या सीना नदीच्या पट्ट्यात रुईछत्तीशी परिसरात झाडा-झुडुपात सुतारपक्षी आढळून येत होते. सुतार पक्षी दिसले की, मन प्रसन्न होऊन जायचे. पण, अलीकडच्या काळात या पट्ट्यातील सुतार पक्षी नामशेष झाले आहेत.
सुतारपक्षाने आवाज दिला की, शेतकरी दुपारचे जेवण करण्यासाठी विसावा घेत होते. पण, आता सुतारपक्षी नामशेष झाल्याने सीना पट्ट्यात व पठारावर किलबिलाट देखील कमी झाला आहे.

नगरपासून जामखेडपर्यंत सीना नदीच्या पट्ट्यात सुतार पक्षी वास्तव्य करत होते. पण, या भागात मागील आठ ते दहा वर्षांत भीषण दुष्काळ पडून पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे राहिलेल्या सुतार पक्ष्यांनी उजनी पट्ट्यात सोलापूर जिल्ह्यात आगेकूच केली. चिमण्या, कावळे,पोपट या पक्षांचे देखील वास्तव्य या भागात थोड्या फार प्रमाणात होते. ते देखील नामशेष झाले आहेत. सोनेरी रंगाचे सुतारपक्षी या भागात सर्वाधिक आढळून येत होते.

सिना पट्ट्यात लिंबाचे सर्वाधिक झाडे असल्याने या झाडांवर सुतारपक्षी कायम वास्तव्य करून राहायचा पण आता या भागातून सुतारपक्षी नामशेष झाल्याने किलबिलाट ऐकू येत नाही. पावसाळ्यात सीना नदीला पाणी आले की सुतारपक्षी पाण्यात पोहण्याचा आनंद घेत होते. अनेक पक्षीमित्रांनी सीना पट्ट्यातील सुतार पक्ष्यांचे छायाचित्र रेखाटले होते. एकंदरीत बदलत चाललेला निसर्ग आणि कमी होत चाललेले पशु-पक्ष्यांचे प्रमाण मानवी जीवनावर देखील परिणाम करत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील भीमा नदी वरील उजनी धरण पक्ष्यांचे माहेरघर बनले आहे. फ्लेमिंगो, माळढोक, सुतार पक्षी व इतर पक्षी येथे पाणी पिण्यासाठी येतात आणि या पक्ष्यांत गर्भगिरी आणि बाळेश्वर डोंगर रांगेतील पक्षी मिसळल्याने सध्या नगरच्या सीना पट्ट्यातील पक्षी कमी होऊ लागले आहेत. सुतार पक्ष्यांना लागणारे किटक सीना पट्ट्यात आढळत होते. ती देखील कमी झाल्याने सोनेरी पट्ट्याचे सुतार पक्षी या भागातून नामशेष झाले आहेत.

वृक्षलागवड, पाण्याची सोय गरजेची

वाढत चाललेली उष्णता, प्रदूषण, नैसर्गिक समतोल, बेभरवशाचे पर्जन्यमान, सातत्याने पडणारा दुष्काळ, यामुळे पक्ष्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे पशु-पक्ष्यांचे वास्तव्य अबाधित ठेवायचे असेल तर, वृक्ष लागवड आणि पाण्याची सोय करणे गरजेचे आहे.

हेही वाचा

पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाचे विलिनीकरण रखडले

माऊलींच्या पालखीचे सोलापुरात आगमन

विठ्ठल मंदिराचे प्राचीन सौंदर्य उजळणार

Back to top button