नगर: नाविन्यपूर्ण शिक्षण घ्या: आ. राजळे, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरातून मार्गदर्शन | पुढारी

नगर: नाविन्यपूर्ण शिक्षण घ्या: आ. राजळे, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरातून मार्गदर्शन

शेवगाव (नगर), पुढारी वृत्तसेवा: आगामी काळात व्यावसायिक क्षेत्रात मोठे रोजगार उपलब्ध होणार असून आपल्या शेजारील छत्रपती संभाजीनगर, पुणे, नगर येथील एमआयडीसीत नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, त्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यवसाय शिक्षण घेतले पाहिजे, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाचे कौशल्य रोजगार उद्योजकता विभाग अंतर्गत शेवगाव येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी नायब तहसीलदार रवींद्र सानप, निशांत सूर्यवंशी, आयुक्त, कौ. वि.रो.व उ. अहमदनगर, दिनेश चव्हाण,जिल्हा व्यवस्थापक ओबीसी महामंडळ, उद्योजक सचिन गोमासे, उद्योजक दत्तप्रसाद कराळे, व्याख्याते ज्ञानेश्वर अनावडे, गणेश मोरे, प्रा. अर्जुन देशमुख, कैलास वाघमारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेवगावचे प्राचार्य उमेश पालवे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाथर्डीचे प्राचार्य अजय वाघ तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.यावेळी 860 मुलांनी शिबिरासाठी नोंदणी केले.

आमदार राजळे म्हणाल्या, नव्या पिढीला परंपरागत शिक्षणाबरोबर काळाची पावले ओळखून नाविन्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे. देशाचे भवितव्य युवा पिढीच्या हातात आहे. त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे माध्यमातून युवक युवतींना मार्गदर्शन करण्यात येत आहे. यातूनच औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेवगाव व पाथर्डी येथे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतील. तसेच नवीन अभ्यासक्रम शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात येतील, असे आमदार राजळे यांनी सांगितले. प्रास्ताविक जिल्हा व्यवस्थापक सुनील शिंदे तर आभार प्राचार्य उमेश पालवे यांनी मानले. सूत्रसंचालन राजेंद्र सदावर्ते यांनी केले.

Back to top button