संगमनेरात ‘जलतृप्ती’चाच घसा कोरडा! | पुढारी

संगमनेरात ‘जलतृप्ती’चाच घसा कोरडा!

संगमनेर शहर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगरपालिकेने शहरातील नागरिकांना थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी खासगी संस्थेच्या मदतीने जलतृप्ती योजना सुरू केली, मात्र तब्बल दोन वर्षांपासून उपनगरातील हे केंद्र बंद आहे. या योजनेचा पूर्णतः फज्जा उडाला आहे. शहरात उभारलेले पाणी केंद्र बंद झाल्याने ऐन उन्हाळ्यात जलतृप्ती योजनेच्याच घशाला कोरड पडल्याचे वास्तव समोर आले आहे.

पालिकेने नागरिकांना शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी नाशिक येथील प्रथमेश एंटरप्रायजेस या संस्थेशी करार केला. या संस्थेने स्वखर्चाने जनता नगर बाजार समितीच्या आवारात पाण्याच्या टाकीखाली छोटा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला. येथे शुद्ध व थंड पाणी करून ते छोट्या वाहनातून ( टेम्पो) फिरवून शहर व उपनगरात नागरिकांना विकले जाते.

शहरात काही महत्त्वाच्या ठिकाणी या संस्थेने जीवनधारा पाणी केंद्र सुरू करून नागरिकांना पाहिजे तेव्हा नाणे टाकून बाटली अथवा जार भरून घेण्याची व्यवस्था केली होती. सुरूवातीला चांगली जाहिरातबाजी करून आरोग्याची काळजी, पाण्याचे महत्त्व पालिकेच्या योजनेच्या घोषणांचे गितातून प्रबोधन करण्यात आले.

नियमित पाणी घेणार्‍यास आगाऊ रक्कम जमा करून कुपनची व्यवस्था करण्यात आली. 1 रुपया 1 लिटर, 5 रुपये 7 लिटर तर कार्डद्वारे (कूपन) 5 रुपयांत 10 लिटर पाणी दिले जात होते. पालिकेचे दररोज हजारो लिटर पाणी वापरले जाते. यातून पालिकेला संस्थेने किती रुपये अदा करायचे, यावर कसलेच नियंत्रण अथवा देखरेख ठेवली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ही संस्था पालिकेचे पाणी वापरत असून, त्याचा हिशोब बाकी आहे.

शहरात नवीन नगर रोडवर प्रांत कार्यालयाशेजारी, मालदाड रोड, भाजी बाजार, गणेश नगर गार्डन, अकोले नाका जाजू पेट्रोल पंपा शेजारी, दिल्ली नाका, जोर्वे नाका, नेहरू चौक आदी ठिकाणी जीवनधारा पाणी केंद्र सुरू केले होते. हे सर्व पाणी केंद्र बंद पडले आहेत. त्यावर धूळ, कचरा व घाण पाहायला मिळत आहे.

गणेश नगर येथील पाणी केद्रांतील साहित्य काढले असून तेथे केवळ सांगाडा बाकी आहे. शहरात फिरणारे टेम्पोही बंद आहेत. गेल्या दीड- दोन वर्षांपासून प्रथमेश एंटरप्राजेस या संस्थेने शहरात पाणी योजना बंद केली. ऐन उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने नागरिकांना आता इतर खासगी पाणी पुरवठा करणार्‍यांकडून जार विकत घ्यावे लागतात. सध्या पाण्याची मागणी वाढली आहे.

आ. बाळासाहेब थोरात यांनी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन केली. उन्हाळ्यातही मुबलक व पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा केला जातो. पालिकेत दीड वर्षापासून प्रशासक राज आहे. यामुळे पाणीपुरवठा समिती सभापती, नगरसेवक आदी पदाधिकारी जाब विचारण्यास नसल्याने याचा पुरेपूर फायदा ठेकेदार घेत आहेत. शहरात बंद असलेले जीवनधारा पाणी केंद्र सुरू करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

‘त्या’ पाण्याच्या शुद्धतेबाबत नियमावली नाही..!

शहरात पाण्याचे जार विकणारे छोट्या टेम्पोतून पाणी विक्री करतात. त्या पाण्याच्या शुद्धतेबाबत कसलीच नियमावली नसल्याने गावोगाव, गल्लीत पाणी जार पुरविणारे व्यवसाय करतात. विशेषतः लग्न समारंभांसह अन्य कार्यक्रमांना जारचे पाणी वापरले जाते. पाण्याचा व्यवसाय सध्या चांगला बहरला आहे. अनेकांनी पॅकिंग पाणी बॉटल प्लँट सुरू केले आहेत. त्यावरही कुणाचेच नियंत्रण दिसत नाही.

उपनगरातील सर्व पाणी केंद्र दोन वर्षांपासून बंद आहेत. सध्या जनता नगरमधील केंद्र सुरू आहे. येथून लग्नासाठी ड्रम, जार भरून दिले जातात. पोट भरण्यासाठी हे उद्योग सुरू आहे. हे केंद्र काढून घेतले पाहिजे. पालिका शुद्ध पाण्याचा पुरवठा करीत असताना ही जलतृप्ती योजना कशासाठी?

                          – अ‍ॅड. श्रीराम गणपुले, भाजप शहराध्यक्ष, माजी नगरसेवक

Back to top button