कोपरगाव : हर्बल आंब्यांसह आता फळे पिकवा विषमुक्त..! | पुढारी

कोपरगाव : हर्बल आंब्यांसह आता फळे पिकवा विषमुक्त..!

महेश जोशी

कोपरगाव : शेतीमघ्ये घातक केमिकल्सचा सर्रास वापर होतो. यामुळे हा उपयोग करणारे घातक रोगाला बळी पाडत आहेत. यावर उपाय म्हणजे विषमुक्त संसाधने वापरणे. याचाच विचार करून डीप-एन-राईप (बुडवा आणि पिकवा) ही फळे पिकवण्याची (आंबा, पोपई, केळी) हर्बल पावडर येथील प्रगतशील शेतकरी सतीश नेने यांनी तयार केली आहे. विशेष असे की, यात कुठलेही केमिकल नाही. नेहमी आढळणार्‍या काही झाडांचा पाला, काही आयुर्वेदिक वनस्पतींसह शेतातील फेकलेले तणासह वनस्पतींचा वापर केला आहे.

सद्यस्थितीत फळे पिकवताना काही मंडळी इथेलीन, फंगीसाईड, पोटॅशियम कार्बाइडचा वापर करतात. यामुळे फळे पिकण्याआधीच पिवळी होतात, मात्र ती खाण्यास घातक असतात. सरकारने यातील काही रसायनांवर बंदी घातली आहे, तरीही ती सर्रास वापरली जातात, या उलट ‘डीप-एन-राईप’ पावडर वापरल्यास फळे लवकर अन् नैसर्गिकरित्या पिकतात. गोडी वाढते व फळ पिकल्यानंतर जास्त दिवस चांगले राहते, हे सर्वस्वस्तात होते.

10 लीटर पाण्यात 400 ग्रॅम पावडर टाकून ते 8-10 दहा मिनीटे उकळून 30 लीटर पाण्यात टाकावे. 40 लीटर द्रावणात पहिल्या दिवशी 8000/8500 आंबे बुडवून पिकत घालावे. दुसर्‍या दिवशी 6500/7000 (एकूण 15000) आंब्यांसाठी ते वापरावे. तिसर्‍या दिवशी नवे द्रावण तयार करावे. यात आंबे 7 मिनिटे बुडवून कोरडे झाल्यावर पिकत घालावे, असे सांगत नेने म्हणाले, कॅन्सरसारख्या भयानक आजाराला यातून आळा बसेल.

माझ्या नैसर्गिक पद्धतीने एक आंबा पिकविण्यास फक्त 0.04 पैशे खर्च येतो. ग्राहकाने केमिकल वापरून पिकवलेली फळे विकत घेऊ नये. मी या प्रॉडक्टचे पेटंट दाखल केले आहे. कारण अशा प्रकारचे उत्पादन अजून भारतात कोणीच तयार केले नाही.
पढेगावचे कृषी पदवीधर

                                                 – सतीश नेने, प्रगतशील शेतकरी,

Back to top button