बोटा नदीपात्रातील बंधार्‍यात तरुणाचा मृतदेह | पुढारी

बोटा नदीपात्रातील बंधार्‍यात तरुणाचा मृतदेह

बोटा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पठार भागात बोटा गावच्या कच नदीवरील केटीवेअरच्या पाण्यावर अज्ञात इसमाचा तरंगता मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही दुर्घटना शुक्रवार (दि.12 मे) रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. कच नदीवरील पाणी साठ्याच्या केटीवेअरजवळ शेती असलेल्या एका शेतकर्‍याला पाण्यावर अज्ञात इसमाचा मृतदेह तरंगताना आढळला. त्याने आजूबाजूच्या नागरिकांना या घटनेची माहिती दिली. पो. पा. शिवाजी शेळके यांनी घारगाव पोलिसांना खबर दिली. पो. नि. संतोष खेडकर घटना स्थळावर दाखल झाले.

पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे. दुर्घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीस खासगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतदेहाची ओळख पटली नाही. मृत तरुण साधारणतः 30 ते 35 वर्षे वयाचा आहे. हा घात की अपघात, याचा तपास पो. नि. संतोष खेडकर व घारगाव पोलिस करीत आहेत.

Back to top button