नगर : जिथे मिळेल मलिदा, तिथेच जाईल कचरा गाडी? | पुढारी

नगर : जिथे मिळेल मलिदा, तिथेच जाईल कचरा गाडी?

नगर : पुढारी वृत्तसेवा : रुग्णालयांतील जैव-वैद्यकीय कचरा दररोज उचलणे बंधनकारक असतानाही जिल्हा रुग्णालयातील कचरा गेल्या सहा दिवसांपासून पडून आहे. दुसरीकडे खासगी रुग्णालयात दररोज कचर्‍याची गाडी जाते, असे चित्र आहे. जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी पाठपुरावा करूनही कचरा गाडी मिळेना, अशी तक्रार आहे. शहरात कचरा संकलनासाठी सुमारे 60 ते 70 कचरा गाड्या धावतात. दररोज चकरा संकलनामध्ये नगर शहराच्या स्वच्छतेत भर पडली. त्यामुळे नगर महापालिकेला केंद्र व राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले. पूर्वी शहरात जागोजागी कचरा टाकला जायचा आणि त्यानंतर तो वाहनांद्वारे एकत्रित केला जात होता.

परंतु, गेल्या पाच वर्षांपासून दररोज थेट वाहनाद्वारे कचरा संकलन होत आहे. त्यामुळे रस्त्यावर कचरा टाकण्याचा प्रश्नच निर्माण होत नव्हता. परंतु, गेल्या काही दिवसांपूर्वी कचरा संकलन करणारी संस्था बदलली. त्यामुळे कचरा संकलनाचा बोजवारा उडाला आहे. सर्वच प्रभागांतील नगरसेवक नाराजी व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, गेल्या सहा दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात कचरा गाडी गेलेली नाही. त्यासाठी शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी उपायुक्तांना फोन केला. कचरा गाडी शहरातील खासगी हॉस्पिटलचा कचरा दररोज संकलित करते. परंतु, जिल्हा रुग्णालयात कचरा गाडी का येत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या सहा दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील जैव-वैद्यकीय कचरा पडून आहे. त्यामुळे जेथे मलिदा तेथील कचराच तातडीने उचलला जातो का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयासारख्या सरकारी यंत्रणेची अशी अवस्था अशी असेल, तर सामान्य नागरिकांची काय व्यथा, असेही बोलले जात आहे.

Back to top button