अहमदनगर: सोनईतील अपघातात युवक ठार, गतिरोधकाचा प्रश्न ऐरणीवर; ग्रामस्थ, पालक आंदोलनाच्या पवित्र्यात | पुढारी

अहमदनगर: सोनईतील अपघातात युवक ठार, गतिरोधकाचा प्रश्न ऐरणीवर; ग्रामस्थ, पालक आंदोलनाच्या पवित्र्यात

सोनई (अहमदनगर), पुढारी वृत्तसेवा: भरधाव वाहनाने मागून जोराची धडक दिल्याने रस्त्याने पायी चाललेला युवक जागीच ठार झाला. हा अपघात सोनई राहुरी रस्त्यावर सोमवारी (दि.17) सकाळी 9 च्या सुमारास झाला. या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असल्याने ग्रामस्थ व पालक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

रामदास किसन गालफाडे (वय 26, रा. यशवंतनगर, सोनई, ता.नेवासा) असे मृत युवकाचे नाव आहे. यशवंतनगर येथून तो सकाळी 9 च्या सुमारास रस्त्याने पायी चालला होता. यावेळी राहुरीकडून सोनईकडे येत असलेल्या चारचाकी वाहनाने (एम एच 12 व्हीसी 7825) त्याला मागून जोराची धडक दिली. या धडकेनंतर हा युवक सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. आसपासच्या ग्रामस्थांनी रुग्णवाहिका बोलून या युवकास नगर येथील रुग्णालयात नेत असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी चालकास पकडून वाहनासह सोनई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

मयत तरुण हा मोलमजुरी करून कुटुंब चालवित होता एक वर्षांपूर्वी याचा विवाह झाला होता. याच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आठ दिवसांपूर्वी यां रस्त्यावर अपघात होऊन मोलमजुरी करणारे रवी खरारे (वय 43) पायी सोनईकडे येत असताना त्यांनाही भरधाव वाहनाने उडविले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना दोन दिवसांपूर्वी खरारे यांचा मृत्यू झाला.

गतिरोधकाबाबत टोलवाटोलवी

आठ महिन्यांत वेळोवेळी झालेल्या अपघातांमुळे रस्ते महामंडळाच्या अधिकार्‍यांशी गतिरोधक बसविण्याबाबत चर्चा केली. मात्र, फक्त टोलवाटोलवी केली जात आहे. त्यामुळे सोनई परिसरातील ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. लवकरच संबंधित विभागास निवेदन देऊन आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिस यंत्रणेची बघ्याची भूमिका

यशवंतनगर ते सोनईपर्यंत शाळा, महाविद्यालय असल्याने रस्त्यावर गर्दी असते. शिर्डी-शनिशिंगणापूर रस्त्यावर बेकायदा प्रवासी वाहतूक करणारी वाहने भरधाव जात असल्याने छोटे-मोठे अपघात होतात. यात अनेकांनी आपले प्राण गमावले आहे. पोलिस यंत्रणा फक्त बघ्याचीच भूमिका घेत आहे. गतिरोधकांचा प्रश्न प्रशासन गांभीर्याने घेत नाही.

Back to top button