नगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा मुक्काम लांबणार | पुढारी

नगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा मुक्काम लांबणार

नगर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरु आहे. अशा परिस्थितीत आणखी चार दिवस वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला. त्यामुळे शेतकर्‍यांत आणखी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान खात्याने 7 एप्रिल ते 9 एप्रिल या कालावधीत वादळी वारे आणि विजाच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यानुसार सलग तीन दिवस पावसाने कहर केला.

या तीन दिवसांत जवळपास 13 हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे नुकसान झाले. आणखी 10 ते 14 एप्रिल या कालावधीत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा तसेच मध्यम स्वरुपाचा पाऊस शेतकर्‍यांना बेजार करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जनावरांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे.

नागरिकांनी स्वत:सह जनावरांचे संरक्षण होईल, याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आरडीसी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले.

Back to top button