नगरमध्ये रंगणार आजी-माजी मंत्र्यांच्या गटांमध्ये दुरंगी लढत | पुढारी

नगरमध्ये रंगणार आजी-माजी मंत्र्यांच्या गटांमध्ये दुरंगी लढत

गोरक्ष नेहे : 

संगमनेर : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंच वार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यावेळी काँग्रेसचे विधि मंडळ पक्षनेते, माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या गटाविरुद्ध विरोधी भाजपचे ज्येष्ठ नेते, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्ये तुल्यबळ दुरंगी लढत रंगणार आहे. यामुळे या निवडणुकीकडे संगमनेर तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आ. बाळासाहेब थोरात यांचे एक हाती वर्चस्व आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीमध्ये अमुलाग्र बदल होऊन या बाजार समितीचे रुपडे पालटले आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत बाजार समितीत विरोधकांना थारा न लागू देता कायम आ. थोरात गटाचे वर्चस्व राहिले आहे, मात्र तब्बल 25 वर्षांनंतर या निवडणुकीत आता भाजप नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी लक्ष घातले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप स्वतंत्र पॅनल तयार करुन निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे.

आ. बाळासाहेब थोरात यांच्या बाजार समितीवरील एकहाती वर्चस्वाखालील सत्तेला शह देण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली भाजप तालुकाध्यक्ष सतीश कानवडेंसह भाजप पदाधिकार्‍यांनी तालुक्यात कार्यकर्त्यांची चांगले फळी निर्माण केली आहे.
आ. बाळासाहेब थोरात गटाकडून माजी सभापती शंकराव खेमनर या पॅनलचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत तब्बल 25 वर्षानंतर काँग्रेसचे आ. बाळासाहेब थोरात यांच्या गटाविरोधात भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे या दोन गटांमध्ये तुल्यबळ दुरंगी लढत होणार आहे. त्यामुळे या वर्षीची निवडणूक थोरात गटाला पाहिजे तेवढी सोपी राहिल की, अवघड जाईल, हे येणारा काळच ठरवेल, परंतु आ. थोरात यांच्या अधिपत्याखालील बाजार समितीमध्ये झालेल्या बदलाचा फायदा आ. थोरात यांच्या गटाच्या उमेदवारांना नक्कीच होणार आहे, हे खरे.

Back to top button