हनुमानरायाच्या रथाचं सारथ्य महिला शक्तीच्या हाती ! पोलिस निरीक्षक मथुरे यांच्या हस्ते हनुमान रथाला लावला भगवा ध्वज | पुढारी

हनुमानरायाच्या रथाचं सारथ्य महिला शक्तीच्या हाती ! पोलिस निरीक्षक मथुरे यांच्या हस्ते हनुमान रथाला लावला भगवा ध्वज

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : ब्रिटिश काळापासून हनुमान जयंतीच्या दिवशी महिलांनी हनुमान रथ ओढण्याची परंपरा कायम जपत शहरातील शेकडो महिलांनी एकत्रित येत ‘पवनपुत्र हनुमान की जय’ चा जयघोष करत हनुमानांचा रथ ओढला. हनुमान जयंतीच्या दिवशी दर वर्षा प्रमाणे याहीवर्षी सकाळी सात वाजण्या च्या सुमारास संगमनेर शहर पोलिस ठाण्यापासून चंद्रशेखर चौकातील पो. नि. भगवान मथुरे यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी भगवे फेटे परिधान करून वाजत- गाजत भगवा ध्वज घेऊन आले. तो भगवा ध्वज ब्रिटिशकाळा पासून आजतगायत चालू असलेल्या हनुमाना रथाला लावून पो. नि. मथुरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

पोलिस प्रशासनाच्यावतीने आणलेला मानाचा ध्वज हनुमान रथावर चढविल्यानंतर एकामागे एक शहरातील शेकडो महिला एकत्र आल्या आणि या सर्व महिलांनी रथाचे दोर हातात धरून दोर ओढत ऐतिहासिक रथोत्सवास चंद्रशेखर चौकातील मोठ्या मारुती मंदिरापासून सुरुवात झाली. ही रथयात्रा चंद्रशेखर चौक, रंगार गल्ली, कॅप्टन लक्ष्मी चौक, बाजारपेठ, तेली खुंट, नेहरू चौक मार्गे पुन्हा चंद्रशेखर चौकात येऊन या रथउत्सवाची सांगता झाली.

या हनुमान रथाच्या मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच या रथाचे जागोजागी उत्स्फूर्त भक्तिभावाने स्वागत करण्यात आले होते. ठिकठिकाणी सुवासिनींनी रथात विराजमान झालेल्या मारुतीरायांची पूजा केली. या मिरवणूक मार्गावर हनुमानरायांच्या दर्शनासाठी हनुमान भक्तांनी एकच गर्दी केली होती. मिरवणुकीत भाविकांसाठी नाश्ता, थंड पेय व पाण्याची व्यवस्था केली होती. हा रथ जन्मोत्सव अभूतपूर्व व्हा. आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस उपअधीक्षक संजय सातव, पो. नि. भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

रथ ओढण्याची परंपरा ऐतिहासिक
गेल्या 32 वर्षांच्या माझ्या पोलिस सेवेत मी अनेक पोलिस ठाण्यांमध्ये काम केले. मात्र संगमनेरात महिलांनी हनुमान रथ ओढण्याची ऐतिहासिक परंपरा माझ्यासाठी नवीन असून ही परंपरा पाहून मी भारावून गेलो असल्याचे पो. नि. भगवान मथुरे यांनी सांगितले.

Back to top button