नगर बाजार समितीसाठी 35 उमेदवारांचे 42 अर्ज | पुढारी

नगर बाजार समितीसाठी 35 उमेदवारांचे 42 अर्ज

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुका बाजार समिती निवडणुकीसाठी आतापर्यंत 35 जणांचे 42 उमेदवारी अर्ज दाखल झाले.
शेतकरी गटातून 10 अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी (दि.3) शेवटची मुदत आहे. निवडणुकीसाठी 27 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. व्यापारी, आडते मतदार संघात विशाल पवार, सुप्रिया अमोल कोतकर, तर हमाल, मापाडीमधून नारायण गिते यांनी अर्ज दाखल केले.

सोसायटी मतदारसंघात माजी उपसभापती भाऊसाहेब काळे, भाऊसाहेब बोठे, मधुकर मगर, गणेश आवारे, सुधीर भापकर, मीनानाथ दुसुंगे, संपतराव म्हस्के, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण म्हस्के, विठ्ठल दळवी, अंकुश शेळके, माजी उपसभापती संतोष म्हस्के, केशव बेरड, माजी जि.प. सदस्य संदेश कार्ले आदींचे अर्ज दाखल झाले. महिला राखीव मतदार संघात अश्विनी विश्वास जाधव, अचल रामदास सोनवणे यांचे तर इतर मागास प्रवर्गमधून संतोष म्हस्के, भाऊसाहेब लांडगे, अरुण म्हस्के यांचे अर्ज दाखल झाले. ग्रामपंचायत मतदारसंघात अंकुश शेळके, प्रवीण गोरे यांचे सर्वसाधारणमधून तर माजी जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ, विठ्ठल दळवी यांचे अर्ज दाखल झाले आहेत.

अनुसूचीत जाती-जमाती मतदारसंघातून अमोल डोळस यांनी अर्ज भरला. व्यापारी आडते मतदारसंघात नंदकिशोर शिक्रे यांचा, तर हमाल मापाडी मतदारसंघात चांगदेव कुसळकर, पोपट घायतडक, बहिरू कोतकर, नीलेश सातपुते, राम पानसंबळ, किसन सानप, अंबादास दहिफळे, विशाल निमसे आदींचे अर्ज दाखल झाले.

सोसायटी मतदार संघात सर्वाधिक 11 जागा
नगर बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या एकूण 18 जागा असून, त्यामध्ये सोसायटी मतदार संघात सर्वाधिक 11 जागा आहेत. या 11 पैकी सात जागा सर्वसाधारण गटासाठी असून, दोन जागा महिला राखीव आहेत. एक जागा इतर मागास प्रवर्गासाठी, तर एक जागा भटक्या जाती जमातीसाठी आहेत. ग्रामपंचायत मतदार संघात चार जागा असून, त्यातील एक जागा अनुसूचित जातीसाठी व एक जागा दुर्बल घटकासाठी राखीव आहे. व्यापारी मतदार संघात दोन जागा, तर हमाल मापाडी मतदार संघात एक जागा आहे. प्रत्येक मतदार संघातील मतदारांना त्या-त्या मतदार संघातील जागांसाठीच मतदान करता येणार आहे.

Back to top button