नगर : सलामीच्या सामन्यावरच कोट्यवधींचा सट्टा; पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष | पुढारी

नगर : सलामीच्या सामन्यावरच कोट्यवधींचा सट्टा; पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष

श्रीकांत राऊत

नगर : यंदाच्या हंगामातील आयपीएलच्या सामन्यांना शुक्रवार (दि.31) पासून सुरुवात झाली असून, नगरमध्ये तीन दिवसांतच बुकींनी कोट्यवधींचा सट्टा बाजार गरम केला आहे. शहरातील सट्टेबाज, बुकींनी लखनौ-दिल्ली सामन्यावर कोट्यवधी रुपयांची सट्टेबाजी करून, कमिशन मिळविल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांचे याकडे सध्यातरी दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी मानल्या जाणार्‍या आयपीएल सामन्यांना तीन दिवसांपासून सुरुवात झाली. तत्पूर्वीच सट्टेबाज आयपीएलची तयारी करून बसले होते. सलामीच्या सामन्यापासूनच कोट्यवधींची सट्टेबाजी सुरू झाली आहे. सावेडी, पाईपलाईन रस्ता, चितळे रस्ता, टिळक रस्ता, सर्जेपुरा, पारिजात चौक आदी भागात आयपीएल सामन्यांवर सट्टा घेणार्‍या बुकींचा बोलबाला सुरू झाला आहे.

सट्टा घेणार्‍या बुकींची संख्या नगरमध्ये मोठी आहे. जवळपास एक हजार छोटे बुकी असल्याची माहिती आहे. छोटे बुकीच ग्राहकांच्या थेट संपर्कात असतात. गतवर्षी नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांच्या विशेष पथकाने आयपीएलच्या सुरुवातीलाच शहरातील सट्टेबाजांवर कारवाई केली होती. गेल्या तीन दिवसांपासून आयपीएलच्या सामन्यांवर कोट्यवधींची सट्टेबाजी सुरू आहे. मात्र, पोलिस प्रशासनाकडून सट्टेबाज व बुकींवर अद्यापि कोणतीही कारवाई नाही.

पोलिसांची मिसफिल्डिंग
सोमवारी झालेल्या लखनौ-दिल्ली सामन्यावर कोट्यवधींची सट्टेबाजी झाली. बुकींनी कोट्यवधींची लयलूट केली. बुकी बाजार गरम झाल्याचे वृत्त पोलिस प्रशासनापर्यंत गेल्याचीही माहिती आहे. सट्टेबाज जोरदार फटकेबाजी करत असताना पोलिस प्रशासनाची मिसफिल्डिंग दिसून येत आहे.

पानटपरी, ज्यूस सेंटरवर सट्टेबाजी
आयपीएलवर लावण्यात येत असलेल्या सट्टेबाजीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अल्पवयींनाचे खिसे रिकामे होत आहेत. प्रोफेसर कॉलनी चौक, पाईपलाईन रस्ता, श्रीराम चौकातील पानटपर्‍या, तसेच ज्यूस सेंटरवर बसून आयपीएलच्या सामन्यांवर सट्टेबाजी सुरू आहे.

’टॉस’पासून शेवटच्या ’बॉल’वर बोली
नाणेफेकीपासून शेवटच्या चेंडूवर सट्टा लागतो. सामन्याच्या जय आणि पराभवाचा दर बुकींकडून ठरविण्यात येतो. चौकार, षटकात होणार्‍या धावा, फलंदाजांकडून केल्या जाणार्‍या धावा आणि प्रत्येक चेंडूवर शंभर पासून हजारांच्या पटीत सट्टा लावला जातो.

Back to top button