शेवगाव : शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा | पुढारी

शेवगाव : शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : गतवर्षी अतिवृष्टीने बाधित पिकांचे अनुदान शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली. सहा महिन्यांपासून शेतकर्‍यांना या मदतीची प्रतिक्षा लागली होती. 45 हजार पेक्षा जास्त शेतकर्‍यांचा डाटा शासनाला सादर झाला असून, उर्वरित शेतकर्‍यांची माहितीही लवकरच सादर होणार आहे.

गत वर्षी एरंडगाव मंडळातील 19 गावांना सततच्या पावसाने, तर शेवगाव, बोधेगाव, चापडगाव, ढोरजळगाव व भातकुडगाव मंडळातील 94 गावांत अतिवृष्टीने कपाशी, बाजरी, सोयाबीन, तूर, गहू आदी रब्बी व खरीप पिके वाया गेली. स्पटेंबर, ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला. सलग आठ दहा दिवस सततचा पाऊस झाला, तर अधूनमधून अतिवृष्टी होत राहिलीने पहिल्या टप्यात जोमदार असणारी पिके अति पावसाने भुईसपाट झाली.

शासनाने बाधित पिकांसाठी हेक्टरी 13 हजार 600 रुपयांची मदत जाहीर केली. यात तीन हेक्टर क्षेत्राची मर्यादा वाढविण्यात आली. अनुदानाचे वितरणात शासनाने बदल करून पंतप्रधान किसान योजनेप्रमाणे थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्याचे धोरण घेतले.

पाच मडंळातील पंचनामा झालेल्या 94 गावांतील 68 हजार 56 नुकसानग्रस्त शेतकर्‍यांपैकी 45 हजार पेक्षा जास्त शेतकर्‍यांची माहिती शासनास सादर झाली असून, इतर शेतकर्‍यांची माहिती सादर होत आहे. शासनास अपडेट झालेल्या माहितीनुसार आता थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही शेतकर्‍याच्या खात्यावर अनुदान जमा झाले आहे. इतर, शेतकर्‍यांनाही लवकरच अनुदान मिळण्याची शाश्वती आली आहे.

Back to top button