श्रीरामपूरचे 130 जण मतदानास मुकणार | पुढारी

श्रीरामपूरचे 130 जण मतदानास मुकणार

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकीसह श्रीरामपूर बाजार समितीची निवडणूक 30 एप्रिल रोजी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. दरम्यान, आज (27 मार्च) पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. असे असताना निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे मागणी करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रम बेकायदेशीर असून, प्रशासक असलेल्या 10 ग्रामपंचायतींच्या 130 सदस्यांना या मतदान प्रक्रियेस मुकावे लागण्याची शक्यता तक्रारीत केली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील रहिवासी प्रदीप आसने यांनी ही तक्रार केली आहे. त्यानुसार श्रीरामपूर तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्याने तेथे प्रशासकराज आहे. त्यामुळे सदस्य मंडळ अस्तित्वात नाही. जुन्या सदस्यांना मताधिकार नसेल. कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना मताधिकार देणे बेकायदेशीर ठरेल. त्यामुळे सुमारे 130 सदस्यांना यातून वगळले आहे.

श्रीरामपूर कृउबा समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील सोसायटी, ग्रामपंचायत हमाल मापाडी व व्यापारी मतदारसंघाच्या मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रदीप आसने यांनी याबाबत श्रीरामपूर पं. स. कार्यालयातून तालुक्यातील प्रशासक आलेल्या ग्रामपंचायतींची माहिती घेऊन हा निवडणूक कार्यक्रम बेकायदेशीर असल्याबाबत तक्रार राज्य निवडणूक सहकारी प्राधिकरणाकडे सादर केली. यामुळे राज्य निवडणूक प्राधिकरणाला जाग आली आहे. यानंतर त्यांनी सदर मतदार यादीमधून प्रशासक असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे वगळण्याचे वृत्त आहे. एकूणच बाजार समितीची रणधुमाळी आजपासून सुरु होणार असल्याचे चित्र दिसत आहे. या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.

18 जागांसाठी निवडणूक
ग्रामपंचायत 566, सोसायटी 879, व्यापारी- 401 तर हमाल मापाडी मतदार संघासाठी 198 असे सर्व मिळून एकूण 2 हजार 44 मतदार त्यासाठी पात्र राहणार आहे. एकूण 18 जागेसाठी ही निवडणूक होणार आहे.

Back to top button