वाळकी : इथे भरतेय रोज चिमण्यांची शाळा ! शिक्षक, विद्यार्थ्यांनी जोपासला पक्षी संवर्धनाचा छंद | पुढारी

वाळकी : इथे भरतेय रोज चिमण्यांची शाळा ! शिक्षक, विद्यार्थ्यांनी जोपासला पक्षी संवर्धनाचा छंद

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. चिमण्यांचे संवर्धन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न अनेक पक्षी मित्रांनी केला. त्यातून थोडेसे का होईना यश आले. चिमण्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी असाच प्रयत्न ग्रामस्थ, शिक्षक अन् विद्यार्थ्यांनी केला आहे. शाळेतील शिक्षक अन् विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानात चिमण्यांसाठी चारा, पाण्याची व्यवस्था केली. शाळा भरण्याच्या वेळेस चिमण्यांसाठी धान्य अन् इतर चारा शाळेच्या मैदानातील ओट्यावर टाकतात. शाळा भरतेवेळी चिमण्यांची चिवचिव शाळेत घुमत असल्याने विद्यार्थ्यांबरोबर चिमण्यांचीही शाळा भरत असल्याचे अनोखे चित्र घुटेवाडी येथील प्राथमिक शाळेत दिसते.

वाळकी येथील उपक्रमशील शिक्षक अन् पक्षीमित्र पोपट पवार यांच्यासह ज्ञानदेव झरेकर यांनी गेल्या पाच वर्षांपासून घुटेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील प्राथमिक शाळेत लोकसहभागातून विविध उपक्रम राबवून शाळेचे रुपडे पालटले. ग्रामस्थांच्या सहभागातून शाळा परिसरात पाण्याचे व्यस्थापन केले. मुबलक पाणी उपलब्ध आसल्याने शाळेच्या परिसरात लोकसहभागातून वृक्षारोपण करत त्यांचे वृक्षसंवर्धन केेले.

ग्रामपंचायत निधीतून पाण्याची व्यवस्था झाल्याने झाडांना पाणी उपलब्ध झाले. यामुळे पाच वर्षात परिसर उंच वाढलेल्या झाडांनी शाळेला वेढा घातला. सर्वत्र हिरवीगार झाडे दिसत आहे. वृक्षांच्या भरभराटीमुळे चिमण्यांसह इतर पक्ष्यांची वर्दळ वाढली. पक्ष्यांची पाणी व चार्‍याच्या शोधार्थ होणारी वणवण थांबविण्यासाठी शाळेच्या परिसरात पाणी व अन्नधान्याची सोय केली. शिक्षक चिमण्यांसाठी बाजरी खरेदी करून आणतात. तर,विद्यार्थ्यांही जमेल तसे अन्न शाळा भरतेवेळी घेऊन घेतात. शाळेच्या मैदानात असलेल्या ओट्यावर धान्य टाकल्याने चिमण्यांचे थवे या ओट्यावर येतात.

सुटीतही विद्यार्थी घेतात काळजी
शाळेला उन्हाळी सुटी असो किंवा अन्य सुटी परिसरातील विद्यार्थी, ग्रामस्थ शाळेच्या मैदानातील ओट्यावर पक्षांसाठी धान्य अन् पाण्याची व्यवस्था करतात. सध्या संपातही विद्यार्थ्यांनी यामध्ये खंड पडू दिला नाही. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची बडबड ऐकू येत नसली, तर चिमण्यांची चिवचिव मात्र परिसरात ऐकू येतेय.

शाळेचा कायापालट करताना स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत, माजी सैनिक संघटना अन् विद्यार्थ्यांची मोठी साथ मिळाली. त्यातून पाणी व चार्‍यासाठी पक्षांची होणारी कासावीस पाहून पक्षांसाठी घोटभर पाणी अन् मूठभर धान्य हा उपक्रम राबविला. चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात असल्याने चिमण्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला. लोकसहभागातून हा उपक्रम राबविल्याने तो यशस्वी झाला. ‘चिमण्यांनो परत फिरा रे’ हा उद्देश सफल झाला.

                                                    – पोपट पवार, शिक्षक

Back to top button