शेवगाव : विजयाच्या उन्मादात रक्तबंबाळ सर्जाचा विसर; वेगाच्या नशेपायी बैलांना जीवघेणा जाच | पुढारी

शेवगाव : विजयाच्या उन्मादात रक्तबंबाळ सर्जाचा विसर; वेगाच्या नशेपायी बैलांना जीवघेणा जाच

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : बैलगाडा शर्यतीच्या थराराने शौकीन व नागरिकांचे मनोरंजन होत असले तरी या स्पर्धेतील वेगाच्या नशेपायी बैलांना मात्र जीवघेणा जाच सहन करावा लागत आहे. बैलांकडून वेगाची अपेक्षित लय गाठण्यासाठी अत्यंत क्रूरपणे आरी, काटेरी तार टोचून, अमली पदार्थांनी आणलेली नशा अशा क्लृप्त्या वापरून त्यांचा छळ केला जात आहे. या स्पर्धेतील बैलांचे रक्तरंजित रूप पाहून शेतकर्‍यांचा जीव की प्राण असलेल्या या सर्जा-राजाला छळण्यात कोणत्या पराक्रमाचा असुरी आनंद मिळत असेल, असा सवाल विचारला जात आहे.

दर वर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वृद्धेश्वर कारखाना ते अमरापूर अशी घोडा-बैलगाडीची शर्यत आज झाली. ती पाहण्यासाठी मोठी गर्दी होती. बैलगाड्यांचा डांबरी रस्त्यावर खाडखाड आवाजात वेगाचा थरार सकाळी सुरू झाला. सकाळी सात वाजता शेवटच्या टप्प्यात अमरापूरजवळ शर्यत येताच स्पर्धेतील विजेता जाणून घेण्यासाठी उत्सुकतेने झुंबड उडाली.

शर्यतीत पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक येणार्‍या शेतकर्‍यांच्या अंगावर नवीन वर्षाचा गुलाल उधळला गेला. आपण जिंकलो आहोत, या भावनेने आनंदात सहभागी असलेले शेतकरी भान हरखून गेले असले, तरी या स्पर्धेतील खरे मानकरी असलेले बैल मात्र रक्तबंबाळ पायांनी धापा टाकत उभे होते. शर्यतीत जिंकण्याच्या आनंदापेक्षा त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे झालेला अनन्वित छळ कोणत्याही सहृद माणसाच्या काळजाचा ठाव घेत होता.

धावताना पाठीवर पडलेले चाबकाचे फटके, पाठीमागून टोचलेली आरी व काटेरी तार, नशा येण्यासाठी देशी दारू व अन्य पदार्थांचा चार्‍यातून दिलेला खुराक, इंजेक्शन यामुळे बेधुंद झालेल्या जनावरांच्या अंगावरील जखमा माणसांच्या असुरी आणि क्रूर वृत्तीचे दर्शन घडवत होते.

त्यांच्या सर्वांगाला दरदरून आलेला घाम आणि धापा टाकत माराच्या धास्तीने धावताना डांबरी रस्त्यावर घसरून पडल्याने रक्तबंबाळ झालेल्या बैल व घोड्यांकडे नजर जाताच गर्दीतून हळहळ व्यक्त होत होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे या शर्यती पुन्हा सुरू झाल्या असल्या, तरी त्यातील आनंद मात्र या क्रूर आणि असुरी प्रयोगांमुळे जनावरांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे.

Back to top button