नगर : दुष्काळाची भीती योग्य की अनाठायी | पुढारी

नगर : दुष्काळाची भीती योग्य की अनाठायी

दीपक रोकडे

नगर : यंदा म्हणजे 2023 च्या मध्यात ‘अल निनो’चा प्रभाव सुरू होण्याची शक्यता अमेरिकेतील नॅशनल ओशॅनिक अँड अ‍ॅटमॉसफेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नोआ) या संस्थेने वर्तवली आहे. ‘अल निनो’चा प्रभाव पडतो, त्या वर्षी भारतात मान्सून कमकुवत होतो, असे सर्वसाधारणपणे सांगितले जाते. त्यातच इन्स्टिट्यूट ऑफ क्लायमेट चेंज स्टडीजचे संचालक डॉ. डी. एस. पै यांनीही भारतात यंदा दुष्काळसद़ृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आणि चिंता वाढली; मात्र भारतीय हवामान विभागाने दुष्काळाबाबतचे हे भाकीत खरे नसल्याचे म्हटले आहे. एकीकडे दुष्काळाची भीती आणि दुसरीकडे ती भीतीच अनाठायी असल्याचे मत, यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

यापूर्वी 2004, 2009, 2014, 2015 आणि 2018 या वर्षी ‘अल निनो’चा प्रभाव होता, म्हणून पावसाचे प्रमाण खूपच कमी होते, अशी मांडणी गेल्या दोन आठवड्यांत अनेक माध्यमांतून करण्यात आली आहे. 2018 नंतर ‘ला निना’ सक्रिय होता, म्हणूनच गेल्या तीन-चार वर्षांत भारतात भरपूर पाऊस बरसला. यंदा मात्र जुलै-ऑगस्टमध्ये ‘अल निनो’चा प्रभाव सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने त्यानंतर मान्सून कमकुवत होत जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

‘अल निनो’बरोबरच यंदा भारतात पुढील दोन महिने नेहमीपेक्षा कडक उन्हाळा असेल, असे सांगण्यात येत आहे. एका अहवालानुसार 1901 नंतर 2022 हे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदले गेले आहे, तर 2023 चा फेब्रुवारी हा 1901 नंतरचा सर्वाधिक तापमान असलेला फेब्रुवारी महिना गणला गेला आहे. याचा अर्थ भारतीय उपखंडात वाढत चाललेले तापमान पावसावरही परिणाम करणारे ठरेल, असे एक मत ‘अल निनो’ला जोडून मांडले जात आहे.

एकास एक नाते जोडणे चुकीचे
दरम्यान, अल निनो किंवा ला निना हे भारतीय मान्सूनवर परिणाम करणार्‍या अनेक घटकांपैकी एक आहेत. त्यामुळे यंदा अल निनोमुळे भारतात दुष्काळ पडेलच, असे ठामपणे म्हणणे चुकीचे ठरेल, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ज्येष्ठ कृषी हवामानशास्त्रज्ञ तथा जालन्याच्या कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद जायभाये यांनी सांगितले. ‘अल निनो’चा परिणाम म्हणून भारतात दुष्काळाची भीती चुकीची असल्याचे भारतीय हवामान विभागानेही स्पष्ट केले आहे.

त्या पार्श्वभूमीवर डॉ. जायभाये म्हणाले, भारतातील मान्सूनबाबतचे चित्र स्पष्ट होण्यासाठी जागतिक व भारतीय उपखंडातील सर्व हवामानशास्त्रीय नोंदी मिळण्यासाठी मे महिन्याची वाट पाहावी लागते. त्या नोंदींच्या आधारेच भारतीय हवामान विभाग मान्सूनविषयीचे अंदाज व्यक्त करतो. मान्सूनविषयी अनुमान व्यक्त करणारी हीच एकमेव खात्रीलायक व शासकीय मान्यताप्राप्त संस्था आहे. अलीकडच्या दशकात पावसाळ्यातील पावसाविषयीचे या संस्थेचे अंदाज अतिशय अचूक आलेले आहेत.

मुळात विषुववृत्ताच्या जवळच्या भूभागावरील पावसाचे अचूक अनुमान काढणे अवघड असते. कारण, या प्रदेशातील हवामानात अचानक बदल संभवतात. त्यामुळे केवळ ‘अल निनो’चा परिणाम म्हणून भारतात दुष्काळ पडण्याचे भाकित करता येणार नाही. विशेष म्हणजे, भारताची भौगोलिक आणि हवामानशास्त्रीय स्थितीत हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत प्रचंड वैविध्य आहे. एकीकडे अतिवृष्टी आणि दुसरीकडे दुष्काळी स्थिती असेही आपण अनुभवत असतो.

त्याला भारतीय उपखंडातील वैविध्यपूर्ण हवामानशास्त्रीय परिस्थिती कारणीभूत असते. केवळ अल निनो किंवा ला निना यावर भारतीय मान्सून अवलंबून नसून भारतीय उपखंडावरील आणि हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि युरोपीयन भूप्रदेश यावरील जल-वायू परिवर्तनाचे इतर घटक यावरही अवलंबून असतो. यामुळे एकास एक नाते जोडून अल निनोच्या प्रभावावर भारतीय मान्सूनचे पूर्णपणे अनुमान करणे चुकीचे ठरू शकते, असेही डॉ. जायभाये यांनी स्पष्ट केले.

Back to top button