नगर : केडगावचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी | पुढारी

नगर : केडगावचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

नगर; पुढारी वृत्तसेवा : केडगाव परिसराचे झपाट्याने विस्तारीकरण होत आहे. त्यामुळे नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून केडगाव परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे केडगाव गावामध्ये तीन दिवसांला सुटणारे पाणी पाच ते सहा दिवसावर गेले आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते तरी प्रशासनाने उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत केली.

केडगाव व कायनेटिक चौक परिसरातील पाणीप्रश्नी नगरसेवक मनोज कोतकर यांनी पाणीपुरवठा विभागात बैठक घेतली. यावेळी जलअभियंता परिमल निकम व पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. जलअभियंता निकम म्हणाले, पाईपलाईन फुटेल त्या दिवशी केडगाव वसाहतीतील संपवेलमध्ये पाण्याचे टँकर आणून टाकले जातील व तातडीने पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.

याचबरोबर कायनेटिक चौक, आव्हाड वीटभट्टी, प्रियंका कॉलनी, रवीश कॉलनी, सारस कॉलनी, लक्ष्मी नगर परिसराला वसंत टेकडी या ठिकाणाहून पाणीपुरवठा केला जातो. पाईपलाईनवरील व्हॅाल्वची तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.

Back to top button