पुणतांबा : पाणी योजनेवरून ग्रामसभेत उडाली खडाजंगी | पुढारी

पुणतांबा : पाणी योजनेवरून ग्रामसभेत उडाली खडाजंगी

पुणतांबा; पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशन पाणी योजना व शिवस्मारक या दोन विषयांवरून ग्रामसभेत सत्ताधारी आणि विरोधकात जोरदार खडाजंगी झाली. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करण्यात आले. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांविरुद्ध राजकीय संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. 26 जानेवारी रोजी तहकूब झालेली ग्रामसभा सरपंच डॉक्टर धनंजय धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या ग्रामसभेत मागील सभेची इतिवृत्त वाचन कुमार हासे यांनी केले. ‘14 वित्त आयोगातून विविध कामे सुचवणे’ हा विषय प्रथम सुरू झाला. त्यात शौचालय व स्वच्छतागृहासाठी जागा निश्चिती, शिवस्मारक यावरून खडाजंगी झाली.

जलजीवन मिशन अंतर्गत अंदाजे 16 कोटी रुपयांच्या योजनेबाबत माहिती दिली जात असताना या योजनेचा जीआर वाचण्यात यावा हा मुद्दा विरोधकांनी लावून धरला. त्यावरून देखील जोरदार बाचाबाची होऊन पाणी प्रश्नाचा मुद्दा गाजला. 16 कोटी रुपयांच्या पाणी योजनेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अधिपत्याखाली कामाला सुरुवात झाली आहे.

या कामाबाबत पारदर्शकता राखावी, या मुद्यावरून अनेकांनी चर्चेत भाग घेतला. जुना साठवण तलाव सिमेंट लाइनिंग करावा, अशी मागणी विकास आघाडीचे धनंजय जाधव यांनी केली. त्यास सर्वानुमते मंजुरी देऊन तो प्रस्ताव सादर करण्याचे ठरवण्यात आले. पाणी योजनेच्या माहितीबाबत बोर्ड लावून जनतेला माहिती द्यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष वाढणे यांनी केली.

जलस्वराज्य टप्पा दोन अंतर्गत खोदकाम केलेला अहवाल अद्यापि जीवन प्राधिकार्‍यांच्या अधिकार्‍यांनी दिलेला नाही. त्या अधिकार्‍यावर कारवाई करण्याचा ठराव वहाडणे यांनी मांडला. पाणी योजनेच्या चर्चेत शिवसेनेचे सुहास वाढणे, चंद्रकांत वाटेकर, शिवाजी गमे, भारत वाढणे, बाळासाहेब भोरकडे, डॉक्टर अविनाश चव्हाण यांनी भाग घेतला.

सोळा कोटी रुपयांच्या पाणी योजनेचे काम व त्याचा दर्जा चांगला राहावा अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.
वाड्या-वस्त्यांचा पाणी योजनेचत समावेश व्हावा. त्यापासून कुणी वंचित राहणार नाही, याबाबत चर्चा झाली. गावातील अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्यातून गुंडगिरी वाढली आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष असून याबाबत जिल्हा पोलिस प्रमुखाकडे तक्रार करणार असल्याचे शिवसेनेचे अनिल नळे यांनी सांगितले.

या ग्रामसभेला माजी सरपंच मुरलीधर थोरात, सर्जेराव जाधव, भास्कर मोटकर, उपसरपंच संदीप धनवटे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती पवार, प्रकाश लोंढे, गौतम थोरात, दशरथ बनकर, ललित शिंदे, राहुल जाधव, बाळासाहेब धनवटे, भूषण वाघ, दीपक धनवटे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध प्रश्नांवर चर्चा झाली.

ग्रामसभेत 30 अर्जांचे वाचन
पुणतांबा रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा तसेच ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी वसुली आदी विषय मांडण्यात आले. काल झालेल्या ग्रामसभेत 25 ते 30 अर्जाचे वाचन करण्यात आले. त्यानुसार कारवाई करणार असल्याचे सरपंच डॉक्टर धनवटे यांनी सांगितले.

 

Back to top button