लोणी : साडेसतरा हजार शेतकर्‍यांना विमा मंजूर | पुढारी

लोणी : साडेसतरा हजार शेतकर्‍यांना विमा मंजूर

लोणी; पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतलेल्या परंतु विमा मिळण्यात अडचण आलेल्या शेतकर्‍यांच्या तक्रारींची दखल घेऊन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे राहाता आणि संगमनेर तालुक्यातील सुमारे 17 हजार 695 लाभार्थी शेतकर्‍यांना 8 कोटी 46 लाख 35 हजार रुपयांचा विमा मंजुर झाला आहे.

खरीप हंगाम 2022 मध्ये राहाता तालुक्यातील बाभळेश्वर, लोणी, पुणतांबा, राहाता, शिर्डी या भागातील सुमारे 15 हजार 461 शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. या कालावधीत आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये या शेतकर्‍यांनी विमा कंपन्यांना झालेल्या नुकसानीची माहिती दिली होती. परंतु सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे विमा कंपन्यांच्या विरोधात शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला होता.

या सर्व शेतकर्‍यांनी महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन विमा कंपन्यांकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात तक्रारी केल्या होत्या. मंत्री विखे पाटील यांनी शेतकर्‍यांच्या तक्रारींची दखल घेऊन उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांना शेतकर्‍यांच्या तक्रारींबाबत गांभिर्याने दखल घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच मंत्रालय स्तरावर सुद्धा महसूलमंत्र्यांनी स्वत: व्यक्तिगत या सर्व मदतीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा केल्यामुळे राहाता आणि संगमनेर तालुक्यातील सुमारे 17 हजार 695 शेतकर्‍यांनी 8 कोटी 46 लाख 35 हजार रुपयांच्या विम्याची रक्कम मंजूर झाली असल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.

या गावातील शेतकर्‍यांना लाभ
बाभळेश्वर मधील 2 084 शेतकर्‍यांना 1 कोटी 2 लाख 95 हजार 771, लोणी मधील 3022 शेतकर्‍यांना 1 कोटी 14 लाख 84 हजार, पुणतांबा 3754 शेतकर्‍यांना 1 कोटी 97 लाख 22 हजार, राहाता मधील 5148 शेतकर्‍यांना 3 कोटी 5 लाख 7 हजार, शिर्डी मधील 1453 शेतकर्‍यांना 5 कोटी 45 लाख, तसेच आश्वी बुद्रुक येथील 394 शेतकर्‍यांना 1 कोटी 16 लाख 30 हजार 856, पिंपरणे येथील 487 शेतकर्‍यांना 9 लाख 31 हजार, साकुर मधील 510 शेतकर्‍यांना 15 लाख 96 हजार आणि शिबलापूर मधील 843 शेतकर्‍यांना 30 लाख 9 हजार याप्रमाणे विमा रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Back to top button