श्रीरामपूर : कॉलेज परिसरामध्ये तरुणास बेदम मारहाण | पुढारी

श्रीरामपूर : कॉलेज परिसरामध्ये तरुणास बेदम मारहाण

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर शहरातील डाकले कॉलेजसमोर बारावीचा पेपर संपल्यानंतर बाहेर आलेल्या विद्यार्थ्याला व त्याच्या एका मित्राला बेदम मारहाण करण्याचा प्रकार काल सायंकाळी घडला. याबाबत निरंजन महादेव गाडे (वय 18, रा. सरस्वती कॉलनी, देवकर वस्ती, वॉर्ड नं. 7, श्रीरामपूर) या विद्यार्थ्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काल दि. 13 मार्च रोजी सायं. 6 च्या सुमारास मी व माझा मित्र प्रसाद असे दोघे पेपर संपल्यानंतर सी. डी. जैन कॉलेज, श्रीरामपूर या कॉलेजसमोर गेटच्या बाहेर आलो असता आफताब, सोफीयान, आदित्य, त्याचा मित्र आणि मोसीन व आणखी एक अनोळखी मुलगा (सर्व रा. वॉर्ड नं. 2, श्रीरामपूर) हे त्या ठिकाणी आले.

त्यांनी आपणास शॉकपच्या पाईपने मारहाण करण्यास सुरूवात केली. आपल्या पाठीवर रॉडने मारून एकाने हाताच्या उजव्या अंगठ्याजवळ चाकुसारख्या हत्याराने दुखापत केली. त्याचबरोबर आपला मित्र प्रसाद यालाही हातावर व डोक्यावर मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गाडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आफताब, सोफीयान, आदित्य व त्याचा मित्र आणि मोसीन व आणखी एक अनोळखी मुलगा, यांच्याविरोधात श्रीरामपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.नि.गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. पाटील हे करीत आहेत.

Back to top button