नेवासा : गोदावरीत बुडालेल्या चौथ्या तरुणाचाही मृतदेह सापडला | पुढारी

नेवासा : गोदावरीत बुडालेल्या चौथ्या तरुणाचाही मृतदेह सापडला

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : प्रवरासंगम येथे शनिवारी दुपारी गोदावरी नदीपाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चौथ्या तरुणाचा मृतदेह रविवारी (दि.12) दुपारी शोध पथकाला सापडला. नागेश दिलीप गोरे असे या तरुणाचे नाव आहे. वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील पाच तरूण श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथांच्या यात्रेला निघाले होते. प्रवरासंगम-कायगाव येथील गोदावरी नदीत सिद्धेश्वर मंदिराच्या घाटाजवळच चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यातील तिघांचे मृतदेह शनिवारी सापडले होते. यानंतर नागेश याच्या मृतदेहाचा शोध पथकाकडून सुरुच होता.

मात्र, नागेश याचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत आपत्कालीन शोध पथकाला सापडला नव्हता. नगर महापालिका अग्निशमन दल व पाण्यातील ऑक्सिजन गॅस पथकाला रविवारी घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या पथकाने रविवारी दुपारी नागेशचा सिद्धेश्वर घाटानजिक शोध लावला. मयत चौघांपैकी बाबासाहेब गोरे व शंकर घोडके हे दोघे विवाहित आहेत.

बाबासाहेबला पत्नी, दोन मुले, तर शंकर यास पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. तिघांवर शनिवारी रात्री 12 वाजता पालखेड मध्ये शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी सापडलेल्या नागेश गोरेच्या मृतदेहाचे नेवासा फाट्यावरील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी पालखेड मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

Back to top button