पारनेर : आ.लंके विरुद्ध विखे यांच्यात लोकसभेचा सामना? | पुढारी

पारनेर : आ.लंके विरुद्ध विखे यांच्यात लोकसभेचा सामना?

शशिकांत भालेकर 

पारनेर : गेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यासमोर कोणीही तेल लावलेला पैलवान नसल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांच्या पुन्हा येईन, या घोषणेला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी धोबी पछाड देत राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग राबविला. नगर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून बड्या घराण्यांचे वर्चस्व आहे. पारनेर तालुका त्याला अपवाद आहे.

आमदार नीलेश लंके यांनी थेट बडे प्रस्थ विखे यांच्यावरच तोफ डागत लोकसभेचा शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. लोकसभेच्या आखाड्यात लंकेंसारख्या राजकारणातील मुरब्बी पहिलवानास राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यास 2024 ची लोकसभा निवडणूक लंके विरुद्ध विखे अशीच होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज (दि.10) आमदार लंके यांच्या वाढदिवसानिमित्त निघोज येथे आयोजित मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात आमदार लंके यांची लोकसभा उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. आमदार लंके कोरोनातील कामगिरीमुळे हिरो झाले आहेत. त्यांनी जिल्हा व जिल्ह्याबाहेर बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांना बळ दिले, तसेच महत्त्वाचा असणारा पाथर्डी व शिर्डी देवस्थानच्या रस्त्याचा प्रश्न त्यांनी उचलून धरत उपोषण केले.

याची दक्षिण लोकसभा मतदारसंघात जोरदार चर्चा झाली. लोकसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा मतदारांकडून व कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. कोरोनात दोन ते अडीच वर्षांत हजारो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी त्यांनी चोवीस तास 365 दिवस परिश्रम घेतले. हीच पुण्याईची शिदोरी कमवित ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा विश्वास कमविण्याचे काम केले. त्यामुळेच आमदार लंके यांनी एखाद्या कार्यक्रमासाठी खासदार पवार यांना निमंत्रण दिल्यास कितीही व्यस्त असले, तरी ते लगेच होकार देतात. तालुक्यातील त्यांचा दौरा नक्की होतो. ही विश्वासार्हता कमविण्याचे काम आमदार लंके यांनी केले.

पस्तीस ते चाळीस वर्षे खासदार म्हणून काम केलेले माजी खासदार स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने जी एस महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर कै. गुलाबराव शेळके यांना उमेदवारी दिली होती. सातत्याने प्रत्येक निवडणुकीत खासदार बाळासाहेब विखे पाटील दोन ते अडीच लाखांनी निवडून येत असत. शेळके यांच्या विरोधात विखे पाटील फक्त पन्नास हजार मतांनी विजयी झाले होते. हा पूर्व इतिहास अनेकांच्या स्मरणात आहे.

त्यावेळी तालुक्यातील जनता पूर्णपणे संघटित झाली होती कै. शेळके यांना फार मोठे पाठबळ मिळाले होते. दिग्गज शक्ती असणार्‍या विखे पाटील यांचा फक्त पन्नास हजार मतांनी विजय ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. याची आठवण शरद पवार यांना असल्यानेच लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज राहा, अशी सूचना पवार यांनी आमदार लंके यांना दिल्याचे बोलले जाते. त्यानुसारच त्यांनी जिल्ह्यात लक्ष केंद्रित केले आहे. निघोज येथील आमदार लंके यांच्या वाढदिवसानिमित्त होणार्‍या मेळाव्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आमदार लंके यांची लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करतात का? याकडे राज्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पवारांना आमदार लंकेंचा अभिमान

आमदार लंके अल्पावधीतच राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे समजले जात आहेत. पवार यांनी देखील त्यांना वेळोवेळी ताकद देण्याचे काम केले. सर्वसामान्य कुटुंबातील नीलेश लंके आमदार होऊ शकतो, याचा अभिमान त्यांना आहे.

पारनेरला लोकसभेची उमेदवारी मिळणार?

यापूर्वी लोकसभेसाठी पारनेरमधून सॉलिसिटर कै. गुलाबराव शेळके यांची उमेदवारी राष्ट्रवादीने दिली होती. त्यावेळी त्यांचा सामना माजी खासदार स्व. बाळासाहेब विखे यांच्याशी झाला होता. पुन्हा एकदा पारनेरचे आमदार लंके व खासदार विखे असा सामना रंगणार का? याची उत्सुकता जिल्ह्याला आहे.

Back to top button