नगर : भौतिकशास्त्राच्या पेपरला 15 कॉपीबहाद्दर रिस्टिकेट | पुढारी

नगर : भौतिकशास्त्राच्या पेपरला 15 कॉपीबहाद्दर रिस्टिकेट

नगर; पुढारी वृत्तसेवा : बारावीची कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाने डोळ्यात तेल घातले तरीही सोमवारी भौतिकशास्त्राच्या पेपरला 15 विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. यामध्ये पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक 9 विद्यार्थी कॉपीकेसमध्ये सापडले आहेत.
बारावीच्या पहिल्याच इंग्रजी पेपरला जिल्ह्यातील 7 विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले होते. त्यानंतर हिंदीच्या पेपरला एक कॉपीकेस आढळली. सोमवारी भौतिकशास्त्राचा पेपर होता. या परीक्षेसाठीही भरारी पथके तैनात होती. पाथर्डी तालुक्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मार्गदर्शनातील पथकाने विविध केंद्रावरील 9 विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले.

पाथर्डी शहरातील श्री तिलोक जैन विद्यालयातील एक तर कोरडगाव येथील हरिहरेश्वर विद्यालय परीक्षा केंद्रामधील सात, तर एम.एम निर्‍हाळी विद्यालयातील परीक्षा केंद्रातील एका विद्यार्थ्याला कॉपी करताना गटविकास अधिकारी डॉ.जगदीश पालवे यांनी रिस्टीकेट केले आहे. तर प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या पथकाने राहाता तालुक्यात एक विद्यार्थी आणि पारनेर तालुक्यात गटविकास अधिकारी किशोर माने यांच्या पथकाने 6 विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहाथ पकडले. संबंधित विद्यार्थ्यांवर बोर्डाच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली.

‘टीएआयटी’ परीक्षेबाबत गोपनियता का?
बारावीच्या परीक्षेवर प्रशासनाची करडी नजर असताना ‘टीएआयटी’ ही शिक्षक अभियोग्यता परीक्षेबाबत शिक्षण विभागातून कमालीची गोपनियता पाळली जात आहे. जिल्ह्यातील अनेकजण ही परीक्षा देत आहेत. ही परीक्षा ऑनलाईन घेतली जात आहे. मात्र, नगरच्या शिक्षण विभागाकडे ही परीक्षा किती विद्यार्थी देत आहेत, ती परीक्षा कोणत्या केंद्रावर सुरू आहे, ती किती पारदर्शी सुरू आहे, याबाबत कोणतीही माहिती नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अगोदरच टीईटी घोटाळा ताजा असताना, टीएआयटी बाबतचा गोंधळ सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Back to top button