टाकळी ढोकेश्वर : चोरट्यांच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी | पुढारी

टाकळी ढोकेश्वर : चोरट्यांच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी

टाकळी ढोकेश्वर; पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील धोत्रे बुद्रुक येथील गोविंद सासवडे यांच्या घरातून शुक्रवार (दि.24) पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान चार चोरट्यांनी 36 हजारांचे दागिने हिसकावत लंपास केले. याबाबत ठकूबाई गोविंद सासवडे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ठकूबाई सासवडेे यांचा मुलगा वसंत गोविंद सासवडे याच्या डोक्यात टणक वस्तुंनी प्रहार केल्याने तो गंभीर जखमी झाला असून, उपचारासाठी त्याला नगर येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने धोत्रे बुद्रुक, धोत्रे खुर्द गावांत चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.

शुक्रवारी पहाटे धोत्रे बुद्रुक येथील गोविंद सासवडे यांच्या घराबाहेर वसंत गोविंद सासवडे झोपले असताना तीन ते चार चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात टणक वस्तूने प्रहार केला. त्यामुळे ते जोरात ओरडले. मुलाचा आवाज ऐकून ठकूबाई सासवडे यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांनी त्यांच्याकडे मोर्चा वळवत कानातले व गळ्यातील सोन्याचे दागिने, वस्तू हिसकावून निघून जाण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान गोविंद सासवडे शेतामध्ये पाणी भरत असताना आरडाओरडा ऐकून ते घराकडे आले. तोपर्यंत चोरट्यांनी मौल्यवान वस्तू व घरातील वस्तू घेऊन पलायन केले.

या घटनेने धोत्रे बुद्रुक, धोत्रे खुर्द गावांत चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांच्या गस्तीची मागणी या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ व श्रीनाथ गवळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत.

किराणासह मोबाईलही पळविला
सासवडे कुटुंबियांच्या घरावर जबरी चोरी करण्याचा प्रयत्न झाला असला, तरी चोरीमध्ये त्यांच्या हाताला फारसे काही लागले नाही. सासवडे कुटुंबीयांनी बुधवारी भाळवणी येथील आठवडे बाजारातून आणलेला किराणा माल घरात ठेवला होता. चोरट्यांनी किराणामालासह घरात असणार्‍या मोबाईलवर डल्ला मारला.

Back to top button