नगर : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | पुढारी

नगर : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. सकाळी माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपतींच्या आश्वरूढ पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. ढोल ताशा, लेझीम या पारंपरिक वाद्यांनी परिसर दणाणून गेला होता. शहरात चौका-चौकात शिवजयंतीचे व्यासपीठ लागले होते. तर, सर्वत्र भगवे ध्वज लागल्याने वातावरण भगवेमय झाले होते.

दरम्यान, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, आयुक्त डॉ. पंकज जावळे, पोलिस अधीक्षक राकेश ओला, आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सेक्रेटरी जी. डी. खानदेशे यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली. पूजेचे पौरोहित्य हभप सिद्धीनाथ मेटे महाराज यांनी केले.

कोरोनानंतर यंदा पहिल्यांदा मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होत असल्याने तरुणांमध्ये मोठा उत्साह होता. सकाळपासून विविध तरुण मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. दरवर्षीप्रमाणे शिवजयंतीनिमित्त छत्रपतींच्या पुतळ्यापासून जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या रेसिडेन्शिअल हायस्कूल, न्यू आर्टस महाविद्यालय, न्यू लॉ कॉलेज, महाराष्ट्र बालक मंदिर, महाराष्ट्र अध्यापक विद्यालय, हॉटेल मॅनेजमेंट इन्सिट्यूट, छत्रपती इंजिनिअरिंग महाविद्यालयासह शाळेचे व महाविद्यालयांचे विद्यार्थी, पदाधिकारी, विश्वस्त, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मिरवणुकीत सहभागी झाले. मिरवणूक छत्रपतींच्या पुतळ्यापासून माळीवाडा, आशा टॉकिज चौक, माणिक चौक, कापडबाजार, तेलीखुंट, चितळे रोड, दिल्लीगेट मार्गे बाहेर पडली.
माणिक चौकात विद्यार्थ्यांना अचानक तरुण मंडळाने, तर चितळे रस्त्यावरील स्व. अनिल राठोड मित्र मंडळाच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले.

कापड बाजार येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने अल्पोपाहार वाटप करण्यात आला. यावेळी सहसेके्रटरी अ‍ॅड. विश्वासराव आठरे पाटील, विश्वस्त मुकेश मुळे, माणिकराव मोरे, डॉ. अभय खानदेशे, राहुल झावरे, अरुणा काळे, प्राचार्य डॉ. भास्कर झावरे, रेसिडेन्सिअलचे प्राचार्य विजयकुमार पोकळे, प्राचार्य एम. एम. तांबे आदी उपस्थित होते. दरम्यान, विद्यार्थ्यांसह अनेक मंडळेही मिरवणुकीत सहभागी झाले होते.

चित्ररथ, लेझीम पथकाने लक्ष वेधले

जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या रेसिडेन्शिअल हायस्कूल, न्यू आर्ट्स कॉलेजच्या सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी शिवजयंती मिरवणुकीत सहभाग घेतला. चित्ररथ, लेझीम, झांज, वारकरी पथक, दिंडी व मावळे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊच्या वेशभूषेत सामील झालेल्या विद्यार्थ्यांनी शिवप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.

चौका-चौकात शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात आज चौका-चौकात स्टेज उभारून जयंती साजरी करण्यात आली. अनेक मंडळांनी आकर्षक देखावे उभारले होते. पोवाडे, गीते अशा विविध कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल होती. तर, सर्वत्र भगवे ध्वज लावल्याने वातावरण भगवेमय झाले होते.

भगवे फेटे अन् बाईकला झेंडा

शहरातील कॉलेज, शाळा, मंडळाच्या अनेक तरुणांनी दिवसभर पांढरा कुर्ता,पाजमा, डोक्याला भगवा फेटा आणि बाईकला छत्रपतींची प्रतिमा असलेला भगवा ध्वज लावला होता. अनेकांनी घरावर भगवे ध्वज उभारले होते. तर, घरीच शिवजयंती साजरी करून परिसरात साखर वाटली.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजाला एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली. सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर सामर्थ्यशाली आणि प्रगतशील राज्य उभे केले छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आजच्या युवकांना प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून काम करण्यासाठी ऊर्जा व प्रेरणा मिळते. माणूस सामर्थ्यवान बनतो.

                                                                   – आमदार संग्राम जगताप

Back to top button