नगर : भांबोरा ग्रामपंचायतीत ‘महिला राज’! | पुढारी

नगर : भांबोरा ग्रामपंचायतीत ‘महिला राज’!

सिद्धटेक : पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील भीमा पट्ट्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणार्‍या भांबोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ताराबाई अनमोल लोंढे व उपसरपंचपदी भारती विकास रंधवे यांची निवड झाली. त्यामुळे ग्रामपंचायतीत महिला राज आले आहे. सत्ताधारी गटात ठरलेल्या निर्णयानुसार सरपंच माधुरी पाटील व उपसरपंच कृष्णा शेळके यांनी राजीनामे दिल्याने, रिक्त झालेल्या पदावर पुन्हा सदस्यांमधून निवडणूक घेण्यात आली. यावेळी सत्ताधारी गटाकडून सरपंच पदासाठी ताराबाई लोंढे व उपसरपंच पदासाठी भारती रंधवे यांनी अर्ज दाखल केला. तर, विरोधी गटाकडून सरपंच पदासाठी मनीषा वासुदेव गोसावी व उपसरपंच पदासाठी वसंत लोंढे यांनी अर्ज दाखल केला.

ठरलेल्या वेळेत कोणीही अर्ज मागे न घेतल्याने गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. यामध्ये सत्ताधारी गटाच्या उमेदवारांना सात, तर विरोधी गटाला सहा मत मिळाले. एक मत बाद झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी प्रकाश कुंदेकर यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामविकास अधिकारी मुरकुटे व तलाठी रवि लोखंडे यांनी सहाय्य केले. यावेळी पोलिस नाईक संभाजी वाबळे, कॉन्स्टेबल संपत शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. विजयी उमेदवार व सदस्यांनी कै.गणपतराव लोंढे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button