शेवगाव तालुका : या दोन पुलांसाठी 6 कोटी मंजूर; मार्चमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात | पुढारी

शेवगाव तालुका : या दोन पुलांसाठी 6 कोटी मंजूर; मार्चमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील 6 कोटी रुपये खर्चाच्या दोन पुलांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. तालुक्यात ठाकूर पिंपळगाव ते चेडेचांदगांव रस्त्यावर मोठ्या पुलाच्या कामास शासनस्तरावर मान्यता देण्यात आली. या पुलासाठी 4 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच भातकुडगाव ते भायगांव रस्त्यावरील नजनवस्तीजवळील पुलाच्या कामासाठी 2 कोटी मंजूर झाल्याची माहिती आमदार राजळे यांनी दिली.

या कामासाठी सार्वजानिक बांधकाम विभाग व नाबार्डच्या अधिकार्‍यांनी पाहणी करुन सर्वेक्षण करण्यात आले आहे. मार्चमध्ये निधी मिळून प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होणे अपेक्षित आहे. संबंधित विभागाचे मंत्री, तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांना या भागातील नागरिकांच्या भावना, पत्रव्यवहार करुन, तसेच समक्ष निवेदन देऊन आमदार राजळे यांनी कळविल्या होत्या.

शेवगांव-पाथर्डी मतदारसंघात दळणवळणाच्या दुष्टीने अनेक मार्गावर पूल होणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामस्थांची पुलांची मागणी सातत्याने होत आहे. त्यानुसार मतदारसंघातील सुमारे 18 महत्वाच्या पुलाच्या कामांची मागणी केली होती. त्यापैकी मागील महिन्यात आपेगांव व खरडगांव -सुसरे या दोन पुलांसाठी 6 कोटी रुपये नाबार्ड अंतर्गत मंजूर झाले.

आज पुन्हा ठाकूर पिंपळगाव – चेडे चांदगांव व भातकुडगांव – भायगांव (नजन वस्ती) या दोन पुलांसाठी 6 कोटी रुपये नाबार्ड अंतर्गत मंजूर झाले आहेत. मतदारसंघातील उर्वरीत पुलांची कामे मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरु आहे.

Back to top button