नगर : ग्रामीण भागात ‘लालपरीची’ अजूनही प्रतिक्षाच | पुढारी

नगर : ग्रामीण भागात ‘लालपरीची’ अजूनही प्रतिक्षाच

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यामध्ये बस आगाराचे स्वप्न अधुरे ठरले आहे. आगार होत नसताना किमान बसस्थानक इमारतीचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा होती. परंतु इमारत पडण्याच्या मार्गावर असताना आता बसगाड्यांच्या तुटवड्याची समस्या सर्वाधिक भेडसावत असल्याचे चित्र आहे. पाच मुक्कामी बसगाड्यांवर राहुरी बसस्थानकाची भिस्त अवलंबून आहे. राहुरीच्या 96 गावांपैकी केवळ 25 गावांमध्ये लालपरी जात असून अजूनही उर्वरीत गावे लालपरीच्या प्रतिक्षेत आहे.

राहुरी येथील बसस्थानकाची इमारतीची मोठी वाताहात झाली. कोणत्याही क्षणी इमारत कोसळेल अशी परिस्थिती आहे. कोरोना कालखंडात 17 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आमदार प्राजक्त तनपुरे यांना यश आले होते. बसस्थानक इमारतीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा असतानाच संपाचा फटका बसला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा वाढलेला तोटा राहुरीच्या बसस्थानकाच्या पथ्यावर आला. निधी तर मिळालाच नाही. परंतु बस गाड्यांची मोठी वाताहात झाली. पूर्वी कोरोना व नंतर संपामुळे एकाच जागेवर उभ्या असलेल्या बस गाड्यांची मोठी हानी झाली. परिणामी राहुरी तालुक्यामध्ये अनेक बसगाड्यांच्या फेर्‍या बंद झाल्या आहेत.

राहुरीच्या ग्रामिण भागातून हजारो ग्रामस्थ, शेतकरी, महिला, शासकीय अधिकारी, कर्मचारी व शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी बस गाड्यांचा प्रवास गरजेचा असतो. परंतु गेल्या सहा महिन्यांपसून राहुरी बसस्थानकाला बस गाड्यांचा मोठा तुटवडा सहन करावा लागत आहे.  श्रीरामपूर, पाथर्डी, नेवासा आगारातून मिळणार्‍या बसगाड्यांमुळे राहुरीच्या ग्रामिण भागामध्ये लालपरी जात होती. पूर्वी किमान 60 ते 70 गांवाचा संपर्क हा लालपरी समवेत होता. परंतु परिस्थितीत बिघाड झाल्याने सद्यस्थितीला केवळ 25 ते 30 गावांमध्येच बस गाडी जात आहे. त्यातही उपलब्ध बस गाड्यांची मोठी वाताहात झाली आहे. परिणामी राहुरी येथे कोळेवाडी मुक्कामी गाडी कधी उपलब्ध असते किंवा नसते. परिणामी सकाळच्या सत्रामध्ये मांजरी येथे जाणार्‍या रेल्वे स्टेशन, आरडगाव, मानोरी, वळण व मांजरी येथे प्रवास करणार्‍यांची कुचंबना होते.

तसेच तीच गाडी म्हैसगाव (कोळेवाडी) येथे जाणारी बसची फेरी कधी सुरू तर कधी बंद ठरते. त्यामुळे बोरटेक, मल्हारवाडी, घोरपडवाडी, वरशिंदे, गडधे आखाडा, चिंचाळे, ताहाराबाद, म्हैसगाव ,कोळेवाडी परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय होते. यासह वांबोरी, ब्राम्हणी, सडे, उंबरे, तमनर आखाडा ग्रामस्थांची अशी गैरसोय होत आहे. राहुरी बसस्थानकाचा वाढलेला तिढा सोडविणार कोण? अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

राहुरीकरांचा बसस्थानकाची समस्या भेडसावत असताना बसगाड्यांच्या तुटवड्याने ग्रामिण भागातील प्रवाशांना मोठी कुचंबना होत आहे. बसगाड्यांच्या कमी झालेल्या फेर्‍याचा लाभ घेत खासगी प्रवाशी वाहतुकदारांनी अव्वाच्या सव्वा भाडेआकारणी करून प्रवाशांची लूट सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत, महाविद्यालयात येण्यासाठी बसगाड्यांच्या अनुपब्धतेने अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शालेय व महाविद्यालयिन तरूण, तरूणींची शैक्षणिक नुकसान होत असल्याने राहुरी बसस्थानकातील गाड्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा लागलेली आहे.

श्रीरामपूर, पाथर्डी व नेवासा आगारातून बसगाड्यांची संख्या वाढविणे गरजेचे बनले आहे. तसेच उपलब्ध बस गाड्यांची मोठी वाताहात झाली आहे. बस गाड्या 15 वर्ष जुन्या असल्याने वाहनांची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे.

 बस गाड्यांचा प्रश्न गंभीर

राहुरी बसथानकाला केवळ चार ते पाच मुक्कामी गाड्या येत आहेत. परिणामी 96 गावांपैकी किमान 25 ते 30 गावांमध्ये बस गाड्यांच्या फेर्‍या करताना नाकी नऊ येत आहे. एकीकडे बस गाड्यांचा तुटवडा तर दुसरीकडे 15 वर्ष जुन्या गाड्या असल्याने दुरूस्तीही वेळेवर होत नाही. राहुरी हद्दीमध्ये किमान 3 ते 4 गाड्या प्रतिदिन रस्त्यातच बंद पडत आहे. नविन बसगाड्या उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे मत राहुरी बसस्थानक विभाग नियंत्रक स.पा. आयकर व सहाय्यक प्रदिप गलियल यांनी सांगितले.

जागतिक देवस्थानांच्या मध्यवर्ती असूनही दुर्लक्ष

शिर्डी येथील साई मंदिर व शनि शिंगणापूर या जागतिक देवस्थानाच्या मध्यवर्ती राहुरी बसस्थानक आहे. परिणामी राहुरीत प्रवाशांची मोठी गर्दी असते. तरीही परिवहन विभागाने पुर्वीपासूनच राहुरी बसस्थानकाकडे दुर्लक्ष केले आहे. पडण्याच्या मार्गावर असलेली बसस्थानक इमारत तर दुसरीकडे बसगाड्यांचा तुटवडा पाहता राहुरीतून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.

Back to top button