नगर : चार किलो गांज्यासह दोघे ताब्यात | पुढारी

नगर : चार किलो गांज्यासह दोघे ताब्यात

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगरमध्ये गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना चार किलो गांजासह भिंगार पोलिसांनी गजाआड केले आहे. नगर-पाथर्डी रोडवरील बाराबाभळी परीसरात गुरुवारी (दि.26) ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना 30 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. वसीम मुजाहीद शेख (रा. बेलेश्वर कॉलनी, विजय लाईन चौक भिंगार), अजय उर्फ सोनू रामचंद मुदलीयार (रा. सिटीझन कॉलनी, विजय लाईन चौक, भिंगार) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी 25 हजार रूपये किमतीचा चार किलो 955 ग्रॅम गांजा, 65 हजार रूपये किमतीचे दोन मोबाईल व पाच लाख रूपये किमतीची स्विफ्ट कार (एच 12 जेसी 8471) असा पाच लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हवालदार अजय नगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवालीचे ठाणेदार संपत शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, उपनिरीक्षक किरण साळंके, गोविंद गोल्हार, विलास गारूडकर, राहुल द्वारके, आदींनी कारवाई केली.

30 पर्यंत पोलिस कोठडी

दोन्ही आरोपींना 30 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख करीत आहेत.

गांजाची विक्री कोणाला?
भिंगारच्या हद्दीत 4 किलो गांजा विक्रीसाठी आणताना दोघांना अटक झाल्याने अवैध धंद्यांचे बिंग फुटले. आरोपी भिंगार मधीलच असून, कोणाला गांजा विक्री करणार होते, याची पोलिसांना माहिती असतानाही त्याचा उल्लेख कुठेही झाला नसल्याची चर्चा सुरू आहे. आता गांजा खरेदी करणार्‍यापर्यंत सहायक पोलिस निरीक्षक देशमुख पोहचणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Back to top button