नगर : अजित पवारांनी 86 कोटी दिले; फडणवीसांकडून किती? | पुढारी

नगर : अजित पवारांनी 86 कोटी दिले; फडणवीसांकडून किती?

नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा नियोजनच्या 2022-23 च्या 453 कोटीच्या आरखड्यात 86 कोटींची वाढ करत तत्कालिन वित्त मंत्री अजित पवार यांनी नगरसाठी 540 कोटींची तरतूद केली होती. शनिवारी नाशिक येथे नगर जिल्हा नियोजन निधी आढावा बैठक होत असून त्यात वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस किती वाढ करतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. वित्तमंत्री फडणवीस यांनी भरघोस वाढ दिली तर जिल्हा परिषदेच्या तिजोरीत आणखी खळखळाट होईल, अशी माहिती सूत्रांनी वर्तविली.

दहा वर्षापूर्वी नगर जिल्हा नियोजनला 110 कोटी इतका निधी मिळत होता. त्यानंतर मात्र, यात कमी-अधिक वाढ होत गेली. यंदाच्या सन 2023-24 करीता शासन निर्धारीत नियतव्य हे नगरसाठी 541 कोटी रुपये आहे. मात्र, जिल्हा नियोजन समितीने सुमारे 753.52 कोटींचा जिल्हा वार्षिक आराखडा तयार करून, शासनाकडे याव्दारे 200 कोटींची वाढीव मागणी केलेली आहे.

यातून जिल्हा परिषदेला 310 कोटींचे नियतव्य मंजूर आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक येथे शनिवारी (दि. 28) वित्त मंत्री फडणवीस हे राज्याचा नियोजन निधी वाटपाचा आढावा घेणार आहेत. यामध्ये शासन निर्धारीत नियतव्य असलेल्या 541 कोटींकडे लक्ष असले, तरी यात नगरने मागणी केलेल्या वाढीव 200 कोटीपैकी किती रक्क्कम वित्तमंत्री फडणवीस वाढवितात, याकडे लक्ष आहे.

दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे आदी नेते हे नगरसाठी जास्तीत जास्त वाढीव तरतूद कशी होईल, यासाठी वित्त मंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार आहेत. तसेच मंत्री फडणवीस हे देखील भाजपचा बालेकिल्ला बनू पाहणार्‍या नगरसाठी वाढीव निधी देवून ताकद देणार असल्याचीही चर्चा आहे.

पालकमंत्री ठरविणार झेडपीला किती!
फडणवीस यांनी नगरसाठी वाढीव निधी दिल्यास यातून जिल्हा परिषदेला किती निधी दिला जाईल, यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन त्यात हा निर्णय होणार आहे.

Back to top button