कोळपेवाडी : पोलिस कर्मचारी वसाहतीचा प्रश्न लागणार मार्गी | पुढारी

कोळपेवाडी : पोलिस कर्मचारी वसाहतीचा प्रश्न लागणार मार्गी

कोळपेवाडी; पुढारी वृत्तसेवा : मागील काही वर्षापासून कोपरगाव तालुका ग्रामीण पोलिस ठाण्याच्या इमारतीचा व कर्मचारी वसाहतीचा प्रश्न गंभीर झाला होता. त्याबाबत निवडून आल्यापासून केलेला पाठपुरावा फळाला आला असून ग्रामीण पोलिस ठाणे इमारत व पोलिस कर्मचारी वसाहतीच्या नवीन इमारतीसाठी 28.50 कोटीच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. अशी माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित असावी, यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव शहर व ग्रामीण असे दोन स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण केले होते. दोन्ही पोलिस ठाण्याच्या इमारतीपैकी शहर पोलिस ठाण्याचे इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. ग्रामीण पोलिस ठाणे व कर्मचारी वसाहतीचा प्रश्न मात्र प्रलंबित होता.

ग्रामीण पोलिस ठाण्याचा कारभार सद्यस्थितीत ज्या ठिकाणी सुरु आहे त्याठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे पोलिस कर्मचार्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अशीच काही परिस्थिती पोलिस कर्मचारी वसाहतीची देखील झाली होती. कित्येक वर्षापूर्वी बांधण्यात आलेली ही पोलिस वसाहत राहण्यासाठी योग्य नसताना व सोयी सुविधांचा अभाव असूनही प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर असलेल्या पोलिस कर्मचारी व त्यांचे कुटुंब जीव मुठीत धरून राहत होते.

याची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी निवडून आल्यापासूनच अनेक शासकीय इमारतींच्या नुतनीकरणाबरोबरच कोपरगाव तालुका ग्रामीण पोलिस ठाणेच्या इमारतीचा व कर्मचारी वसाहतीच्या नुतनीकरणाचा प्रश्न आपल्या मुख्य अजेंडयावर घेतला होता. तेव्हापासून तात्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या गृह आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता.

याबाबत मागील वर्षी दि.6 एप्रिल रोजी महाविकास आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार, तात्कालीन गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील, तात्कालीन ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोपरगाव पंचायत समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी आले असता. पोलिस ठणेच्या इमारतीसाठी निधीची मागणी केली होती.

पोलिस वसाहतीत असणार अत्याधुनिक सुविधा
प्राप्त निधीतून ग्रामीण पोलिस ठाणे इमारत, 2 बीएचके 56 कर्मचारी फ्लॅट, 3 बीएचके 8 फ्लॅट, संरक्षक कंपाऊंड, पार्किंग व्यवस्था, वसाहतीच्या अंतर्गत रस्ते, ड्रेनेज सुविधा, लँडस्केपींगसह ग्रामीण पोलिस ठाणे इमारत व कर्मचारी वसाहतीसाठी सौर उर्जेचा वापर करण्यात येणार आहे. तसेच पोलिस ठाण्यात फर्निचर, लिफ्ट सुविधा व सुसज्ज अग्निशमन यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

पोलिस कर्मचार्‍यांच्या वसाहतीची झालेली वाताहत डोळ्यांना पाहवत नव्हती. अशा परिस्थितीत ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून चोवीस तास काम करणारे पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंब कसे दिवस काढीत असतील याची कल्पना करणे अवघड होते. त्यामुळे निवडून आल्यापासून पोलिस कर्मचारी वसाहतीचा प्रश्न मार्गी लावायचाच असा मनाशी निश्चय केला होता. त्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना शब्द पाळणारा नेता अशी ख्याती असलेल्या अजितदादा पवार यांनी मागील वर्षी कोपरगावच्या जाहीर सभेत निधी देण्याचे जाहीर केले होते तो शब्द आज पूर्ण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिस ठाणेच्या इमारतीचा व कर्मचारी वसाहतीचा प्रश्न मार्गी लागला याचे मोठे समाधान वाटते.
                                                          -आ. आशुतोष काळे.

Back to top button