नगर : ‘मुळा’ डावा, उजवा कालव्यांचे आवर्तन सुरु | पुढारी

नगर : ‘मुळा’ डावा, उजवा कालव्यांचे आवर्तन सुरु

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मुळा धरणाच्या पाण्याचे नियोजन झाल्याने अखेर शासकीय आदेशान्वये पाणी आरक्षण निश्चिती झाली. मुळाच्या डाव्या व उजव्या कालव्यातूनच रब्बीचे आवर्तन सोडण्यात आले तर उन्हाळ्यामध्ये शेतकर्‍यांना दोन्ही कालव्यांमधून प्रत्येकी दोन आवर्तन निश्चिती करण्यात आली आहे. मुळा धरणाच्या पाण्यावर राहुरीसह नगर, नेवासा, पाथर्डी, शेवगाव हद्दीतील शेतकर्‍यांचे भवितव्य अवलंबून आहे. पिण्याच्या पाण्यासह शेती समृद्धतेमध्ये मुळा धरणाचा मोठा वाटा आहे. त्यानुसार मुळा धरणाच्या एकूण पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक गरजेचे असते, परंतु ग्रामपंचायत व पदवीधर निवडणुकीच्या आचासंहितेचा अडसर निर्माण होऊन मुळाची आवर्तन निश्चिती होत नव्हती. एकीकडे शेतकर्‍यांची आवर्तन सोडण्याची मागणी तर दुसरीकडे आचारसंहिता पाहता अखेर मुळा धरणाच्या शासकीय प्रशासनानेच पुढाकार घेत धरणाच्या पाण्याचे आरक्षण जाहीर करीत अंदाजे आवर्तन निश्चिती करीत शेतकर्‍यांसाठी आनंद वार्ता दिली आहे.

मुळा धरणामध्ये 25 हजार दलघफू पाणी साठा शिल्लक असल्याने पाण्याबाबत शेतकर्‍यांमध्ये समाधानकारक परिस्थिती आहे.
मुळा पाटबंधारे विभागाने अधिक्षक अभियंता सागर शिंदे यांच्या मार्गदर्शनामध्ये रब्बी हंगामाचे आवर्तन सोडले आहे. डाव्या कालव्यावर आधारित असलेल्या रब्बीच्या 3 हजार हेक्टर पीकांसाठी 240 क्यूसेक प्रवाहाने आवर्तन सोडण्यात आले तर उजव्या कालव्यावर आधारित असलेल्या 26 हजार हेक्टर क्षेत्रासाठी 1350 क्यूसेक प्रवाहाने पाणी वाहत आहे. दोन्ही कालव्यांची आवर्तने सोडल्याने 29 हजार हेक्टर रब्बी पिकांना संजीवनी मिळाली आहे.

डाव्याचे आवर्तन शेतकर्‍यांच्या मागणीनुसार सुरू असून, त्यासाठी 400 दलघफू पाणी आरक्षित आहे. 10 जानेवारीपासून डाव्याचे आवर्तन अंदाजे 25 जानेवारीपर्यंत सुरू राहिल. उजव्या कालव्यातूनही 10 जानेवारीपासून रब्बीचे आवर्तन सोडले आहे. 1350 क्यूसेकने उजवा कालवा वाहत आहे. त्यासाठी 4 हजार दलघफू पाणी खर्च होणार आहे. उजव्याचे रब्बी आवर्तन अंदाजे 14 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहिल,असे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले.

समितीच्या निर्णयाने आरक्षण जाहीर : सायली पाटील

मुळा धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी सर्व कागदपत्रांची पुर्तता झाली होती. डिसेंबरपासून बैठकीचे नियोजन केले जात होते, परंतु ग्रामपंचायत निवडणुकानंतर पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता पाहता राजकीय पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक घेता आली नाही. शेतकर्‍यांना शेती नियोजनासाठी पाणी आरक्षण व कालावधी महत्वाचा असल्याने अखेर शासकीय प्रशासनाने पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता सागर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रब्बी व उन्हाळी हंगामाचे आवर्तन निश्चित केल्याचे कार्यकारी अभियंता सायली पाटील म्हणाल्या.

Back to top button