नगर : महिला सरपंचाचे झेडपीत उपोषणास्त्र ! | पुढारी

नगर : महिला सरपंचाचे झेडपीत उपोषणास्त्र !

नगर : पुढारी वृत्तसेवा : 15 व्या वित्त आयोगातून ठेकेदारांकडून कामे करून घेतली, मात्र पीएफएमएस प्रणालीतून बीले अदा करण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे ठेकेदार आता पदाधिकार्‍यांकडे तगादा करत असताना, दुसरीकडे प्रशासनही अपेक्षित प्रतिसाद देत नाही. त्यामुळे आता सरपंचासह सदस्यांनीच जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशव्दारालगत उपोषण सुरू केल्याचे पहायला मिळते. संगमनेर तालुक्यातील शेंडी हे साधारणतः 1500 लोकसंख्येचे गाव आहे. तीन वर्षांपूर्वीच ग्रामपंचायतीची निर्मिती झालेली आहे. 15 व्या वित्त आयोगातून या ग्रामपंचायतीच्या खात्यात 14 लाख 59 हजार 308 रुपयांचा निधी प्राप्त आहे. स्थानिक पदाधिकार्‍यांनी आराखडा तयार करून त्यातून चार कामेही पूर्ण केलेली आहेत.

परंतु पीएफएमएस प्रणालीव्दारे हा निधी वितरीत करण्यासाठी अडचणी येत असल्याने बीले अदा झालेली नाहीत. त्यामुळे आता ठेकेदार थेट सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांकडे बिलाची मागणी करू लागला आहे. सर्व सदस्यांनी संगमनेर पंचायत समितीकडे व्यथा मांडल्या. मात्र त्यांनीही समाधानकारक मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे आता सीईओ आशिष येरेकर, अतिरीक्त सीईओ संभाजी लांगोरे यांचे लक्ष वेधण्यासाठी सरपंच कमलताई गावडे यांच्यासह उपसरपंच भाऊसाहेब उगले, सदस्य बाळू काळे, सुमन उगले, प्रभाबाई उगले, पांडू गावडे, दीपक उगले यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे. पीएफएस प्रणालीतील अडचणी दूर कराव्यात, किंवा धनादेशाने बीले काढण्याची परवागनी मिळावी, अशी मागणीही यावेळी उपोषणकर्त्यांनी केली आहे. सायंकाळी उशीरापर्यंत हे उपोषण सुरूच होते.

Back to top button