नगर : जानेवारीत तिप्पट मोफत धान्य; डिसेंबर महिन्याच्या धान्याचा देखील समावेश | पुढारी

नगर : जानेवारीत तिप्पट मोफत धान्य; डिसेंबर महिन्याच्या धान्याचा देखील समावेश

नगर; पुढारी वृत्तसेवा : सवलतीच्या दरात अन्नधान्य घेणार्‍या जिल्ह्यातील 30 लाख लाभार्थ्यांना यंदाच्या वर्षी मोफत धान्य वितरित होणार आहे. जानेवारी महिन्यात मिळणारे मोफत तसेच गेल्या डिसेंबर महिन्यात वितरित करण्याचे बाकी असलेले नेहमीचे व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नधान्य योजनेचे मोफत दुपटीचे असे एकूण तिपटीने धान्य उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात या महिन्यात जवळपास 46 हजार मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप होणार आहे. एकाच महिन्यात तिपटीने आणि मोफत धान्य घरात येणार असल्यामुळे गोरगरिबांची चंगळ होणार आहे.

गोरगरिब जनता अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य शासनाने 70 वर्षांपूर्वी गोरगरिब रेशनकार्डधारकांना स्वस्तदरात अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला. 2015 पासून प्राधान्य कुटुंबयोजनेतील रेशनकार्डधारकांना मानसी तीन किलो गहू 2 रुपये किलो व दोन किलो तांदूळ 3 रुपये किलो दराने उपलब्ध होत आहे. अंत्योदय योजनेतील कार्डधारकांना 35 किलो धान्य दिले जात आहे. यासाठी जिल्हाभरात दरमहा सरासरी 16 हजार मेट्रिक टन धान्य वाटप केले जात आहे.

कोरोना काळात केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री गरीब योजनेमार्फत दरमहा मोफत अन्नधान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे 31 डिसेंबर 2022 पर्यंत ही योजना सुरुच होती. त्यामुळे जिल्हाभरातील जवळपास 7 लाख रेशनकार्डधारकांना सलग दोन वर्षे दरमहा दुपट रेशनचे धान्य मिळत होते.

जानेवारी महिन्यात दिले जाणारे मोफत रेशनच्या धान्याबरोबरच गेल्या डिसेंबर महिन्यातील बाकी असलेले नेहमीचे विकतचे धान्य तसेच प्रधानमंत्री गरीब योजनेचे मोफतचे असे दुपट धान्य दिले जाणार आहे. यामधील नेहमीचे विकतचे धान्य देखील या महिन्यात मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला.

फेब्रुवारीपासून नेहमीप्रमाणेच मिळणार धान्य
31 डिसेंबर 2022 पर्यंत राज्यभरातील रेशनकार्डधारकांना दरमहा दुपट रेशनधान्य मिळत होते. प्रधानमंत्री गरीब योजनेचे मोफतचे धान्य बंद केले. त्यामुळे आता नेहमीप्रमाणे दरमहा मानसी तीन किलो गहू, दोन किलो तांदुळ असे पाच किलो अन्नधान्य वर्षभरासाठी मोफत मिळणार आहे.

पात्र रेशनकार्ड संख्या
अंत्योदय कार्डधारक : 87630
लाभार्थी संख्या : 407419
‘प्राधान्य’ कार्डधारक : 605990
लाभार्थी संख्या : 2545473

Back to top button