नगर : ब्राह्मणवाडा आरोग्य केंद्र जिल्ह्यात प्रथम | पुढारी

नगर : ब्राह्मणवाडा आरोग्य केंद्र जिल्ह्यात प्रथम

बोटा : पुढारी वृत्तसेवा :  अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा आरोग्य केंद्राला जिल्ह्यात शासनाच्या ‘कायाकल्प’ पुरस्कारासाठी प्रथम क्रमांकाचे नामांकन जाहीर झाले. तर विठा, म्हाळादेवी आरोग्य केंद्राला प्रोत्साहनपर शासनाच्या ‘कायाकल्प’ पुरस्कारासाठी नामांकन जाहीर झाले आहे. शासनाकडून निर्धारित केलेली मानक पूर्ण करून ब्राह्मणवाडा, विठा, म्हाळादेवी आरोग्य केंद्राने स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रित करीत या कामात सातत्य ठेवून नागरिकांना स्वच्छ आरोग्यदायी वातावरणात उत्तम प्रतीच्या सुविधा दिल्या आहेत. येथील आरोग्य अधिकारी तसेच कर्मचारी, आशा सेविका यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर ब्राह्मणवाडा आरोग्य केंद्राने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा कायाकल्प पुरस्कार व विठा, म्हाळादेवी आरोग्य केंद्राने प्रोत्साहनपर पुरस्कार पटकावला आहे.

या पुरस्काराने ब्राह्मणवाडा, विठा, म्हाळादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राने आपल्या उत्तम प्रतीच्या सेवेचा आदर्श जिल्ह्यात निर्माण केल्याने सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. सन 2021-22 साठी अहमदनगर जिल्ह्यातील 46 प्राथमिक आरोग्य केंद्राचे मूल्यांकन हे राज्य स्तरावरून निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार व राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राद्वारे तयार केलेल्या चेकलिस्ट प्रमाणे करण्यात आले होते. यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कारात अ.नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राला कायाकल्प पुरस्कारात प्रथम क्रमांक तर विठा, म्हाळादेवी आरोग्य केंद्राला प्रोत्साहनपर ‘कायाकल्प’ पुरस्कारासाठी नामांकन झाल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

देशात 2 ऑक्टोबर 2014 पासून स्वच्छ भारत अभियानाची सुरवात झाली. नागरिकांना सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता व संसर्ग नियंत्रण तसेच आरोग्यदायी वातावरणात आरोग्य सुविधा मिळाव्यात. तसेच या संस्थांमधील आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांनी या कामात सातत्य ठेवावे. तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाकडून कायाकल्प पुरस्कार योजना राबविली जात आहे. यामध्ये तालुक्यातील ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविल्याने एक लाख रुपये मानधन तसेच मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक मिळणारं आहे. तसेच विठा, म्हाळादेवी आरोग्य केंद्राला प्रोत्साहनपर कायाकल्प पुरस्कार मिळाल्याने प्रति 50 हजार रुपये मानधन मिळणार आहे.

 

ब्राह्मणवाडा आरोग्य केंद्रात गेली पाच वर्षांपासून इथे वैद्यकीय आधिकारी म्हणून कार्यरत आहे. तसेच डॉ. बी. टी. सोनवणे देखील वैद्यकीय आधिकारी साथ देत आहेत. या केंद्राच्या कार्यक्षेत्रात 17 गावे 14 ग्रामपंचायती असून यात 7 उपकेंद्र नागरिकांना आरोग्य सेवा देत आहे. यात 2 वैद्यकीय आधिकारी, 7 सिएचओ, 35 कर्मचारी, आशा सेविका यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे.या सर्वांचे सहकार्याने आणि उत्तम प्रतीच्या कामगिरीने आम्ही शासनाच्या कायाकल्प पुरस्कारात जिल्ह्यात हे आरोग्य केंद्र प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे.
                          – डॉ. भारत ताले, वैद्यकिय आधिकारी, ब्राह्मणवाडा

Back to top button