नगर : पारनेरचा ऊस ‘विखे’ उचलणार ! पालकमंत्र्यांचा साखर कारखाना धावला ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या मदतीला | पुढारी

नगर : पारनेरचा ऊस ‘विखे’ उचलणार ! पालकमंत्र्यांचा साखर कारखाना धावला ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या मदतीला

जवळा : पुढारी वृत्तसेवा :  पारनेर तालुक्यातील शेकडो हेक्टर ऊस हा तोडणी वाचून उभा असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. मात्र, शेतकर्‍यांच्या मदतीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे धावून आल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विखे कारखान्याची ऊस तोडणी यंत्रणा पारनेर तालुक्यात दाखल झाल्याने शेतकर्‍यांचा जीव भांड्यात पडला आहे. जवळा परिसरातील शेतकर्‍यांचा ऊस हा तोडणीवाचून शेतातच उभा असल्याचे वृत्त ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. या माध्यमातून प्रशासनासह शासनाचेही लक्ष वेधण्यात आले. याबाबतची तातडीने दखल घेत नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विखे पाटील सहकारी कारखान्याने पारनेर तालुक्यातील ऊस तोडणीसाठी आपली यंत्रणा रवाना केली.

विखे पाटलांनी पारनेरच्या शेतकर्‍यांना दिलासा देत तोडणी वाचून रखडलेला ऊस नेण्याची तयारी दर्शवत प्रत्यक्ष तशा हालचाली सुरू केल्या आहेत. एकट्या जवळा पट्ट्यात सुमारे चौदाशे ते पंधराशे टन ऊस तोडणी वाचून शेतात उभा आहे. सुमारे दोन ते तीन महिन्यांपर्यंत ऊस तोडणी लांबल्यामुळे उसाला तुरे लागले आहेत. उसाचे वजन घटून शेतकर्‍यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत असल्याचे चित्र सध्या तालुक्यात पाहायला मिळत आहे. हतबल शेतकर्‍यांना कोंडीत पकडून काही कारखान्याची व ऊसतोडणी टोळ्यांची मनमानी या परिसरात चालू झाली आहे.

एकरी सहा ते सात हजार रुपये ऊस तोडणी टोळ्या शेतकर्‍यांना मागू लागल्या आहेत, तर अधिकारी जवळच्यांंची तोंडे पाहून ऊसतोडणी करू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येऊ लागला आहे. पालकमंत्र्यांच्या विखे पाटील साखर कारखान्याने पुढाकार घेत ऊस तोडणी करण्याची तयारी दर्शविली. तशी यंत्रणा ही लगेच तालुक्यात पाठविली. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे

Back to top button