नगर : शिवराष्ट्र सेनेचे जलसमाधी आंदोलन | पुढारी

नगर : शिवराष्ट्र सेनेचे जलसमाधी आंदोलन

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील वाडिया पार्क येथील जलतरण तलावात काही दिवसांपूर्वी लघुशंका करतानाचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर शिवराष्ट्र सेनेने आवाज उठवला होता. या चुकीच्या गोष्टींबाबत जलतरण तलाव ज्या संस्थेला चालवण्यास दिला, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांना निवेदन देऊन केली होती. मात्र, कोणतीच कारवाई न झाल्याने बुधवारी (दि.11) आक्रमक होत जलतरण तलावात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले आहे.

ज्या कर्मचार्‍यांनी चुकीचे कृत्य केले. त्याला कामावरून काढत ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा विभागाने शिवराष्ट्र सेनेने दिलेल्या निवेदनाला आणि त्यानंतर दिलेल्या स्मरण पत्रावर कोणतीच कारवाई केली नाही. याबाबत चौकशी करून संस्थेचा ठेका रद्द करावा अशी मागणी करूनही वर्षभरात कोणतीच कारवाई केली नसल्याने अखेर आज शिवराष्ट्र सेनेरर्फे वाडिया पार्क येथील जलतरण तलावात अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी जलसमाधी आंदोलन केले. यावेळी बंदोबस्तासाठी पोलिस उपस्थित होते.

शिवराष्ट्र सेनेच्या पदाधिकार्‍यांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी दर्शवली होती. यावेळी जिल्हाक्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांच्या समवेत चर्चा केली. यावर त्यांनी लवकर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक अनिल शेकटकर, बाबासाहेब करपे, मनोज औशीकर, संजय सुगंधी, गणेश शेकटकर, आनंद बगन, राकेश सारवान, सुनीता चौहान, शीतल चोटीले आदी उपस्थिती होत्या.

Back to top button