नगर : नगररचनाच्या कर्मचार्‍यांना नोटिसा | पुढारी

नगर : नगररचनाच्या कर्मचार्‍यांना नोटिसा

नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी मंगळवारी सकाळी अचानक नगररचना विभागात प्रवेश करून कर्मचार्‍यांचा आढावा घेतला. तर, सुमारे अर्ध्याच्यावर कर्मचारी जागेवर नव्हते. हाल-चाल रजिस्टरवर नोंदही नव्हती. तर, आवक-जावक, वर्कशीट अपूर्ण अससलेल्या कर्मचार्‍यांच्या चांगलीच झाडाझडती घेतली. त्या सर्व कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटिसा काढल्या आहेत.
महापालिकेच्या नगररचना विभागातील कर्मचारी नेहमीच फिल्डवर्कच्या नावाखाली गायब असतात, अशा अनेक तक्रारी आयुक्त डॉ. जावळे यांच्याकडे आल्या होत्या. मंगळवारी सकाळी आयुक्त डॉ. जावळे यांनी कार्यालयात आल्यानंतर लगेच नगररचना विभागात धाड टाकली. त्यावेळी बोटावर मोजण्या इतकेच कर्मचारी हजर होते.

आयुक्तांनी गैरहजर कर्मचार्‍यांचा आढावा घेतला. कोण कोठे गेले आहे, याची संबंधित अधिकार्‍यांकडे विचारपूस केली. तर, अनेकांची कोणत्याच प्रकारची नोंद नव्हती. त्यामुळे कर्मचार्‍यांचा बनाव घडकीस आला.

आयुक्त जावळे यांनी तत्काळ कर्मचार्‍यांचे वर्कशीट, हाल-चाल रजिस्टर, आवक-जावक रजिस्टर ताब्यात घेऊन अस्थापना विभागाला तपासणी करून कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना दिल्या.महापालिकेतील प्रत्येक विभागात अशेाच प्रकारे तपासणी कारण्यात येणार आहेत. कर्मचारी न सांगता कार्यालयातून गायब असल्यास त्याची चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे.
                                             – डॉ. पंकज जावळे, आयुक्त महापालिका

Back to top button