कर्जतमध्ये महिला कुस्त्यांचा रंगणार आखाडा | पुढारी

कर्जतमध्ये महिला कुस्त्यांचा रंगणार आखाडा

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : येथील दादा पाटील महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अ. भा. आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांच्या हस्ते झाले.  यावेळी आमदार रोहित पवार. राजेंद्र फाळके, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दीपक माने, सहायक क्रीडा संचालक डॉ. दत्ता महादम, अंबादास पिसाळ, राजेंद्र निंबाळकर, बप्पाजी धांडे, कुस्ती स्पर्धेचे निरीक्षक डॉ. राजेंद्र खत्री, नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, मधुकर कन्हेरकर उपस्थित होते.स्पर्धेसाठी देशभरातील 130 विद्यापीठातील कुस्ती संघ आले आहेत. स्पर्धेचे ध्वजारोहण प्र.कुलगुरू सोनवणे व स्पर्धेचे निमंत्रक राजेंद्र फाळके, आमदार पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार पवार म्हणाले, कर्जत-जामखेड मतदारसंघाचे नाव देशपातळीवर नेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेतली आहे. भारतातून आलेल्या प्रत्येक खेळाडूने या स्त्री शक्तीच्या इतिहासाचे अवलोकन करावे, असे आवाहन पवार यांनी केले.

प्र.कुलगुरू डॉ. सोनवणे यांनी कर्जतसारख्या निमशहरी भागात ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कुस्ती या प्रकारानेच भारताला पहिल्यांदा ऑलिंपिकमध्ये पदक मिळवून दिले होते. भविष्यात अशा महिलांच्या कुस्ती स्पर्धा देशभर होतील. या कुस्ती स्पर्धेतून अनेक पालक प्रेरणा घेवून, मी माझ्या मुलीला कुस्तीगीर बनविण्याची तयारी करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. भविष्यातील अनेक ऑलिंपिकपटू अशा स्पर्धेतून भारताला मिळतील, अशी इच्छाही व्यक्त केली. आभार प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. राम काळे, प्रा. रोहिणी साळवे, प्रा. स्वप्निल मस्के यांनी केले.

Back to top button