नगर : जि. प. शाळांमधील संगणके धूळखात ; शाळांमध्ये संगणक प्रशिक्षक नाही | पुढारी

नगर : जि. प. शाळांमधील संगणके धूळखात ; शाळांमध्ये संगणक प्रशिक्षक नाही

अकोले : पुढारी वृत्तसेवा : संगणक प्रशिक्षक नसल्याने अकोले तालुक्यातील जि.प.शाळेतील संगणक संच सद्य स्थितीला धूळखात पडून आहेत. ज्या व्यक्तीला संगणकाचे ज्ञान नाही, ती व्यक्ती अडाणी असल्याचे समजले जाते. सध्याचे युग हे संगणक युग आहे. संगणकाशिवाय कुठल्याही प्रकारचे व्यवहार साध्य होत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये संगणक हे आवश्यक झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला संगणक संच देण्यात आले. मात्र, अकोले तालुक्यात अनेक शाळांमध्ये संगणक शिक्षक नसल्यामुळे हे संगणक धूळखात पडल्याने संगणक प्रशिक्षक नेमण्याची मागणी परिसरातून होत आहे.

पहिल्या वर्गापासून ते प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे कुठेतरी मिळाले पाहिजे. संगणकाची माहिती मिळाली पाहिजे, या उद्देशाने शासनाने राज्यात संगणक दिले आहेत. अकोले तालुक्यात 472 संगणक आहेत. तर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला कुठे 2 तर कुठे 5 संगणक संच तर कुठे 8 संगणक संच देण्यात आले. तसेच आ. डॉ. किरण लहामटे यांनी सुमारे 75 संगणक जि.प. शाळेला देण्यात आले आहेत. तर आदिवासी भागातील बहुतांश जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संगणक संचही शासनाकडून देण्यात आलेले आहेत. त्यापैकी काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण दिले जाते. मात्र, बहुतांश जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये संगणक धूळखात पडलेले दिसते.

काही शाळेत उंदरांनी वायरिंग तोडल्याचे दिसून येत आहे. लाखो रुपयांचे संगणक धूळखात पडलेले असून, याचा कुठलाही फायदा विद्यार्थ्यांना होत नाही, ही शोकांतिका म्हणावी लागेल. काही ठिकाणी शाळेतील संगणक चोरीला गेले असुन अद्यापही पोलिसांना शोध लागला नाही. जिल्हा परिषदेच्या शाळेतील संगणक काही गुरुजींच्या घरी असल्याचे समजते. अकोले तालुक्यातील 389 प्राथमिक शाळामध्ये 472 संगणक असले तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देणार्‍या संगणक प्रशिक्षका अभावी अकोले तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

 

तालुक्यात 389 जिल्हा परिषदेच्या शाळा असून, पूर्ण शाळेला संगणक संच दिले आहेत. शासना मार्फत शाळेला निधी दिला जातो. परंतु शासनाने शाळेत विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देण्यासाठी संगणक शिक्षक नेमण्याची आवश्यकता आहे.
           -अरविंद कुमावत, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, अकोले.

Back to top button