नगर : भंडारदरा परिसरात “थर्टी फर्स्ट” करताना सावधान! पोलीस आणि वन्यजीव विभागाचे असणार करडी नजर | पुढारी

नगर : भंडारदरा परिसरात "थर्टी फर्स्ट" करताना सावधान! पोलीस आणि वन्यजीव विभागाचे असणार करडी नजर

अकोले (नगर), पुढारी वृत्तसेवा : निसर्गरम्य कळसुबाई आणि हरिश्चंद्र गड अभयारण्यासह भंडारदरा परिसरात ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करताना आणि निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेताना पर्यटकांना वन्यजीव व पोलिसांच्या नियमाचे पालन करावे लागणार आहे. नियम भंग करणाऱ्यावर कडक कारवाई करिता पोलिस व वन्यजीव विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ असलेल्या भंडारदरा, घाटघर, कळसुबाई आणि हरिश्चंद्र गड अभयारण्यात नव्या वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नगर, नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई परिसरातील नागरिकांनी शुक्रवारपासुनच फायर कॅम्प, गिर्यारोहण, नौका विहार, नाईट कॅम्प अशा विविध ठिकाणी मोठी गर्दी केली आहे. भंडारदरा, कळसुबाई आणि हरिश्चंद्र गड अभयारण्यात नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राजुर पोलिस व वन्यजीव विभागाने मोठा बंदोबस्त ठेवला आला आहे.

तसेचं थर्टी फर्स्ट” साजरा करणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीवर अंकुश ठेवण्यासाठी राजुरचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे आणि वन विभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमावली लागू करण्यात आली आहे. भंडारदरा धरणाच्या कडेला असणारे कापडी तंबूंचे कॅम्पिंग पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहे. तंबूमध्ये वास्तव्यास येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. नववर्षांच्या स्वागतासाठी रात्री आणि मध्यरात्रीच्या वेळी मोठा जल्लोष असतो. यामुळे पोलिसांकडून पर्यटकांचे आयडी प्रूफ, मोबाईल नंबर, वाहन नंबर याची सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणी करण्यात येणार आहे. नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा बडगा पोलीस व वन्यजीव विभागाकडून उगारण्यात येणार आहे. टेन्ट साईटवर रात्री दहा वाजल्यानंतर मोठ्या आवाजात संगीत वाजविण्यास निर्बंध लादण्यात आलेले आहेत.

 

Back to top button