नगर : ऐन थंडीत राहुरीत राजकारणाचा चढला पारा ! | पुढारी

नगर : ऐन थंडीत राहुरीत राजकारणाचा चढला पारा !

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी मतदार संघामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागला. ग्रामस्थांनी पक्ष न पाहता केवळ चेहरा पाहून उमेदवाराला मते दिली. गाव पातळीवर राजकीय पक्षविरहित आघाड्या स्थापन होऊन निवडणुका झाल्या, परंतु निवडीत गाव पुढार्‍यांच्या सत्कारावरून राजकीय रणकंदन चांगलेच पेटले आहे. एकाच विकास कामाचे दोनदा उद्घाटन करीत एकमेकांवर आरोपांची चिखलफेक होत असताना मात्र सर्वसामान्यांचे प्रश्न अंधारित असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. राहुरीत तनपुरे विरोधात विखे-कर्डिले गटामध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

गुलाबी थंडीची हुडहुडी वाढविलेली असताना दुसरीकडे राजकीय पारा मात्र चांगलाच वरचढ ठरत असल्याचे चित्र आहे. राहुरी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. ग्रामस्थांनी गाव पातळीवर स्थापन केलेल्या स्थानिक आघाड्यांमधील विकासासाठी शाश्वत असणार्‍या चेहर्‍यांना चुन-चुनके मतदान करीत गाव पुढार्‍यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली. गावामध्ये कोणत्याही पक्षाचे अस्तित्व न पाहता केवळ विकासात्मक चेहरा म्हणून लोकनियुक्त सरपंच व सदस्यांची निवड झाली.ग्रामपंचायतींचा निकाल लागला. तो तुझा व हा माझा म्हणत निवडीत सरपंचांसह सदस्यांची ओढाओढी सुरू झाली.

या नेत्याच्या घरी ती पार्टी तर त्या नेत्याच्या घरी दुसरी पार्टी असे करीत ग्रामपंचायतीचा विकास कोसो दूर ठेवत निवडीत पदाधिकार्‍यांनी सत्काराला महत्व दिल्याचे दिसले. कोणत्या नेत्याकडे किती जास्त पदाधिकारी सत्काराला आले, यावरून पेटलेले रणकंदन आता राजकीय चिखलफेकीपर्यंत पोहोचल्याचे दिसले. आ. प्राजक्त तनपुरे हे राहुरी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. शासनाकडून मंजूर झालेल्या विकास निधीबाबत आ. तनपुरे यांजकडून विकास कामांचे उद्घाटन केले जात आहे. शांत व संयमी राहत केवळ विकास कामांबाबत भाषण देणारे आ. तनपुरे यांच्या शब्दातही आता हिवाळी अधिवेशनाचा पारा दिसत आहे. विरोधी भाजपच्या नेत्यांकडून विकास कामांना आडकाठी घातली जात असल्याचे सांगत नाही केलेल्या कामांचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करणारे विखे-कर्डिले गटाला ते शालजोड्यातून फटके देत असल्याचे दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी विखे हेच पराभवासाठी कारणीभूत असल्याचे सांगत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानात घडलेल्या गोष्टी मांडल्या होत्या. त्यानंतर विखे-कर्डिले यांचे समेट होऊन झाले गेले विसरून आता खा. डॉ. सुजय विखे व माजी आ. कर्डिले यांनी,‘तुझ्या गळा, माझ्या गळा,’ म्हणत तनपुरेंवर शरसंधान सुरू केले आहे. खा. डॉ. विखे यांनी कर्डिले यांना नाकारत मोठी चूक केल्याचे सांगत ही चूक पुढील विधानसभेत सुधारावी लागेल, असे सूचक विधान केले आहे. राज्यात 6 खात्यांचे राज्यमंत्रीपद असतानाही राहुरीचा कोणताही विकास न करता आलेल्या तनपुरेंना योग्य ती जागा दाखविण्याचा ईशारा कर्डिले यांनी दिला आहे.

वांबोरी, कणगर, सात्रळ, तांभेरे. कानडगाव, वडनेर, चिंचविहीरे आदी गावांमध्ये विकास कामांच्या माध्यमातून आरोपांची चिखलफेक सुरू झाली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस शासन अवतरल्याचा लाभ हा विरोधी भाजप गटाला सर्वाधिक होत असल्याचे दिसत आहे. राज्यमंत्री पद गेल्यानंतर तनपुरे गटाला बॅकफूटवर फेकण्याचा प्रयत्न विखे-कर्डिले गटाकडून होत असताना दुसरीकडून तनपुरे गटाकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. कोणी कितीही प्रयत्न करा आगामी जि. प. व पं. समितीमध्ये यश मिळवूच, असा दावा राष्ट्रवादी गटाने केला असताना दुसरीकडे खा. डॉ.विखे व कर्डिले यांनी तनपुरेंच्या लढतीविरोधाला धार देत जोरदार हल्ला चढविला. राज्यमंत्री पदाच्या काळात ज्यांना राहुरीचे ग्रामीण रुग्णालय, बसस्थानक, पोलिस व महसूल इमारतीचा प्रश्न सोडविता आला नाही, अशी टीका केली आहे.

राजकारणाने पो. नि. दराडेंचा बळी

राहुरीच्या तापलेल्या राजकारणामुळे विकास कामे मार्गी लागावे, अशी अपेक्षा जनसामान्यांना लागली, परंतु प्रशासनाचे रिमोट आपल्याकडेच, अशी अपेक्षा बाळगत राजकीय नेते व्यूवहरचना आखत असल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाचे रिमोट हाती राखण्यासाठीच पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची राहुरीतून उचलबांगडी करण्यासाठी मोठी खेळी खेळली गेल्याची चर्चा होत आहे. तापलेले राजकारण पाहता विविध खात्यातील प्रशासकीय अधिकार्‍यांना पेटलेल्या वणव्यातून बचाव करताना ‘नाकी नऊ’ आल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे.

Back to top button