शेवगाव तालुका : आणखी एका वाळू तस्कराला अटक, पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न | पुढारी

शेवगाव तालुका : आणखी एका वाळू तस्कराला अटक, पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न करणार्‍या हायवा वाहनासह बोलेरो, स्कार्पिओ असा 43 लाख 50 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आणखी एका आरोपीला ताब्यात घेतल्याने अटक केलेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे. शेवगावचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल, हवालदार बाबा शेळके, बप्पा धाकतोडे, राहुल खेडकर हे पथक दि.22 रोजी वाळू वाहनांवर कारवाई करण्यासाठी खासगी वाहनाने शेकटे ते लाडजळगाव रोडवर मुरमी शिवारात नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन करीत होते. त्यावेळी वाळूने भरलेला एक हायवा समोरून येताना दिसला.

पथकाने नाकाबंदी करुन त्यास थांबविण्याचा इशारा केला असता, सदर वाहन चालकाने पोलिसांना ठार मारण्याच्या उद्देशाने हायवा वाहन त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी बाजूला उड्या घेतल्याने ते बचावले. परंतु, हायवाने पोलिसांच्या खासगी वाहनास धडक दिली व चालक वाहन घेऊन पसार झाला.

या हायवा गाडीचा पोलिस पाठलाग करीत असताना, काही जणांनी पोलिसांच्या वाहनासमोर बोलेरो, स्कार्पिओ व काही मोटर सायकली आडव्या लावून हायवा वाहन व चालकास तेथून पळून जाण्यास मदत केली होती. पोलिस निरीक्षक विलास पुजारी व पथकाने शोध घेऊन हायवा, स्कार्पिओ, बोलेरो असा 43 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून स्कार्पिओ चालक अमोल एकनाथ नाटकर (वय 35, रा.राक्षसभुवन ता. गेवराई, जि. बीड) यास शनिवारी अटक केली आहे. यापूर्वी यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Back to top button