पाथर्डी : लोकसभेसाठी मुद्दा उचलला नाही : आमदार नीलेश लंके | पुढारी

पाथर्डी : लोकसभेसाठी मुद्दा उचलला नाही : आमदार नीलेश लंके

पाथर्डी : पुढारी वृत्तसेवा :  लोकसभा निवडणूक लढवायची म्हणून आपण महामार्गाच्या कामांचा मुद्दा उचललेला नाही. या रस्त्यांच्या कामासंदर्भात यापूर्वीही महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधानसभेत आवाज उठविला होता. रस्त्याच्या कामासाठी सर्वांचे हात टेकले म्हणून आपण हात घातला आणि या प्रलंबित कामाला सुरू होण्यास यश आले आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. आमदार नीलेश लंके यांचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर ते उपोषण स्थळावरून थेट मोहटादेवीच्या चरणी नतमस्तक झाले. कल्याण-निर्मल (विशाखापट्टणम) या राष्ट्रीय महामार्गाचे काम शनिवारपासून प्रत्यक्षात सुरू झाल्याने पाथर्डी तालुक्यातील जनतेने वाजत गाजत लंके यांचा स्वागत व सत्कार केला.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र दौंड, बंडू पाटील बोरुडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख, पांडुरंग शिरसाट, अनिल ढाकणे, देवा पवार, आतिश निर्‍हाळी, योगेश रासने, सीताराम बोरुडे, चांद मणियार, शिवसेनेचे सचिन नागापुरे, सुरेश हुलजुते, रामराव चव्हाण, अनिकेत निगुरकर आदी कार्यकर्ते त्यांच्या समवेत उपस्थित होते. आमदार लंके हे श्रीक्षेत्र मोहटादेवी दर्शनाला पाथर्डी तालुक्यात आले असता गावोगावी तसेच शहरात नागरिकांनी त्यांचा सत्कार केला. मोहटादेवी माता रस्त्याचे काम सुरू झाले आहे हे काम पूर्णत्वास जाऊ दे…अशी प्रार्थना आमदार लंके यांनी देवीकडे दर्शन घेतेवेळी केली.

श्री मोहटा देवस्थानच्या वतीने विश्वस्त डॉ.श्रीधर देशमुख, संदीप घुले यांनी आमदार लंके यांचे स्वागत केले. पाथर्डी शहरातील स्व वसंतराव नाईक चौक, अजंठा चौक, क्रांती चौक, नवी पेठ, कोरडगाव चौक या ठिकाणी आमदार लंके यांचा नागरिकांनी सत्कार केला. पाथर्डी तालुका सराफ सुवर्णकार संघटनेनेही त्यांचा भव्य सत्कार केला. संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जिरेसाळ, सल्लागार राजेंद्र शेवाळे, मधुकर मानकर, संजय दराडे, महेश पंडित, सुनील भांगे, सुनील चिंतामणी, मोदक मानुरकर आदी व्यापारी बांधव उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना आमदार लंके म्हणाले, या रस्त्याबाबत आमदार लंके स्टंटबाजी करतात, असे म्हणणार्‍यांनी माहिती करून घ्यावी की, आपण या रस्त्यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. आपण राजकारणासाठी काही करत नाही, हा आपला इतिहास पहा. एक संघर्षशील कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे पाहिले जाते. ज्या ज्या वेळेस परिसरातील लोकांवर संकट येते त्यावेळेस मी धावून जातो, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

विरोधात बोलणार्‍यांचे काम काय?
काही राजकारणी मंडळी ही केवळ बोलघेवडी आहे. जे माझ्या विरोधात बोलतात, त्यांच्या कामाचं काय? त्यांचे प्रत्यक्षात काहीच काम नाही. आरोप करण्याचा त्यांचा हा फक्त धंदाच आहे, असा आरोप आमदार नीलेश लंके यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता केला.

Back to top button