नगर : गोवरसाठी टास्क फोर्स कमिटी : अध्यक्षपदी आयुक्त डॉ. जावळे | पुढारी

नगर : गोवरसाठी टास्क फोर्स कमिटी : अध्यक्षपदी आयुक्त डॉ. जावळे

नगर : पुढारी वृत्तसेवा :  मुंबई शहरात गोवर आजाराचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्य विभागाने सर्वत्र सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नगर शहरात गोवर प्रतिबंधक टास्क फोर्स कमिटीची स्थापना करण्यात आली. कमिटीच्या अध्यक्षपदी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची नियुक्ती करण्यात आली. आज झालेल्या बैठकीत शहरात दोन टप्प्यात लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांमध्ये गोवर आजाराचे प्रमाण वाढले आहे. गोवर प्रतिबंधासाठी राज्यात आरोग्य विभागाची धावपळ सुरू आहे. आरोग्यमंत्री काल राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ, जिल्हा शल्यचिकित्सक यांची बैठक घेतली.

त्यात बैठकीत राज्यात एकही लहान मुल गोवर लसीकरणापासून वंचित राहू नये, अशा सचूना केल्या. त्यानुसार आज महापालिकेत आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभाग व शहरातील आरोग्य संघटना, वैद्यकीय अधिकार्‍यांची बैठक झाली. त्या बैठकीत गोवर प्रतिबंधासाठी कास्ट फोर्स कमिटीची स्थापना करण्यात आली आणि कमिटीच्या अध्यक्षपदी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीमध्ये गोवरचे लसीकरण सतत सुरू आहे. मात्र, काही नागरिक लसीकरणासाठी आरोग्य केंद्रात येत नाही असे काही मुले आज गोवर लसीकरणापासून वंचित आहेत.

त्यांची संख्या साधारण हजाराच्या घरात आहे. त्यामुळे 15 ते 25 डिसेंबर 2022 व 15 ते 25 डिसेंबर 2023 अशी दोन टप्प्यात बालकांचा शोध घेऊन लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी संपूर्ण तयारी केली आहे. तसेच, खासगी रुग्णालयात जन्मलेल्या बालकांचा गोवरची लस देण्यात येणार आहे. लस दिल्यानंतर त्याची नोंदही घेण्यात येणार आहे. दोन टप्प्यात होणार्‍या लसीकरणामध्ये लसीचे दोन डोस देण्यात येणार आहेत.

संशयितांचे नमुने तपासणीस पाठविणार

दोन टप्प्यात बालकांचा शोध घेऊन लसीकरण करण्यात येणार आहे. त्यात बालकांना ताप, पुरळ आढळल्यास तत्काळ संशयितांचे नमुणे घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. बालकांच्या अंगावर संशयास्पद पुरळ दिसून आल्यास तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

खाटिक गल्लीत आढळला रुग्ण

मुंबईवरून काही नागरिक शहरात येतात. त्यांनी बाळांची काळजी घेणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी खाटीक गल्लीमध्ये आलेल्या एका कुटुंबातील बालकाला गोवरची लक्षणे दिसून आली. ही बाब लक्षात आल्यानंतर तत्काळ उपचार करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी माहिती दडवून ठेवून नये.

Back to top button