वाळकी : रस्तालूट करणारी परप्रांतीय टोळी जेरबंद | पुढारी

वाळकी : रस्तालूट करणारी परप्रांतीय टोळी जेरबंद

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातून जाणार्‍या विविध महामार्गांवर रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अडवून त्यांना गावठी कट्ट्याचा व चाकूचा धाक दाखवून लूटमार करणारी परप्रांतीय सराईत गुन्हेगारांची टोळी एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीकडून एक गावठी कट्ट्यासह 9 लाख 93 हजार 728 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मारूती चंद्रकांत जाधव (रा.कोंढवा खुर्द, ता.हवेली, जि.पुणे) हे जालना येथून त्यांच्या ट्रकमधून 12 टन ज्वारी औरंगाबाद-नगर महामार्गाने पुण्याकडे घेऊन जात होते. इमामपूर घाटात दोन मोटार सायकलवर आलेल्या चोरट्यांनी त्यांना मारहाण करत दि.20 ऑक्टोबरला रात्री 2.30 च्या सुमारास ट्रक पळवून नेला होता. त्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात 21 ऑक्टोबरला गुन्हा दाखल करुन, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ यांच्याकडे देण्यात आला होता.

तपासात या गुन्ह्यातील ट्रक दिंडोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेवारस स्थितीत रिकामा आढळून आला. सदर ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असता, त्यातील माल हा नेवासा ते मालेगाव दरम्यान कोणत्यातरी अज्ञात ठिकाणी खाली केलेला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांना आला. यातील चोरीस गेलेली 12 टन ज्वारी व आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक दि. 27 ऑक्टोबरला नेवासा, गंगापूर, येवला, मनमाड, मालेगाव या परिसरात रवाना केले होते. मालेगाव बाजार समिती येथे या पथकाने गोपनीय माहिती काढून एक अनोळखी इसम हा ज्वारी विक्रीसाठी घेऊन येत असल्याबाबत व सदर ज्वारीचे रोख स्वरुपात पैसे मागत असल्याबाबत माहिती मिळाली.

सदर माहितीवरुन त्या अज्ञात इसमाचा मोबाईल नंबर मिळवून त्याचा शोध घेतला असता, तो खुल्ताबाद येथे राहणारा असल्याचे निष्पन्न झाले. त्यास खुल्ताबाद येथून दि.4 नोव्हेंबरला ताब्यात घेतले असता, त्याने त्याचे नाव असिम सईद बुखारी असल्याचे सांगितले. सदर ट्रक चोरीचा गुन्हा हा त्याने खुल्ताबाद येथे राहणारा आरोपी नासीर गफार अब्दुल याच्या नगरच्या मुकुंदनगर येथे राहणारा मुस्ताक अहमद गुलाम रसूल शेख, उत्तरप्रदेशचे अमरसिंग मठलुराम सिंग, पियुष कौशल शुक्ला, पश्चिम बंगालचा मेहबूब ईस्माईल शेख यांच्यासह एकत्रित येऊन केल्याचे व सदर चोरीचा माल विकण्याची जबाबदारी आपल्याकडे दिल्याचे सांगितले.

तपासादरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत अमरसिंग, पियुष शुक्ला, मेहबुब शेख हे विळद घाट येथे आल्याची माहिती मिळाली. त्यावेळी पोलिस पथकाने या ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेत अंगझडती घेतली असता एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. सदर गावठी कट्ट्याचा वापर आम्ही रस्तालूट करताना धाक दाखविण्यासाठी करणार होतो, असे त्यांनी सांगितले. तसेच, ट्रक चोरीच्या गुन्ह्याचीही कबुली दिली आहे. या गुन्ह्यातील 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून, ते सराईत गुन्हेगार आहेत.
सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे, उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ, उपनिरीक्षक योगेश चाहेर, हेडकॉनस्टेबल संदीप खेंगट, पोलिस नाईक दीपक गांगर्डे, गणेश कावरे, गजानन गायकवाड, किशोर जाधव, भगवान वंजारी, सूरज देशमुख, ज्ञानेश्वर तांदळे यांच्या पथकाने केली.

Back to top button