नगर : कायदा सुव्यवस्था राखण्याची पोलिसदादांची होतेय कसरत ! | पुढारी

नगर : कायदा सुव्यवस्था राखण्याची पोलिसदादांची होतेय कसरत !

नगर तालुका : नगर तालुक्यातील 110 गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम अवघे 13 पोलिस अधिकारी व 164 कर्मचार्‍यांमार्फत सुरू आहे. विशेष म्हणजे, या गावांबरोबर भिंगार, मुकुंदनगर, सारसनगर या शहरी भागाची जबाबदारीही याच पोलिस ठाण्याकडे आहे. नगर तालुक्यातील 110 गावांसाठी तीन पोलिस ठाणे कार्यरत आहेत. एमआयडीसी पोलिस ठाणे, नगर तालुका पोलिस ठाणे, भिंगार कॅम्प पोलिस ठाणे या तीन पोलिस ठाण्याअंतर्गत 110 गावांतील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे. त्यातील भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याअंतर्गत भिंगार, मुकुंदनगर व सारसनगर या शहरी भागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलिस उपनिरीक्षक व 55 कर्मचारी कार्यरत आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत 31 गावे येत आहेत. तसेच, औद्योगिक वसाहत ही याच पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येते. एकूण पाच अधिकारी व 55 कर्मचारी 31 गावे व औद्योगिक वसाहतीमधील कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करत आहेत.

नगर तालुका पोलिस ठाण्याची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. येथे तर सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलिस उपनिरीक्षक व 54 कर्मचारी काम पाहत आहेत. तालुका पोलिस ठाणेअंतर्गत तब्बल 69 गावे येत असून, येथे पाच पोलिस कर्मचारी संलग्न म्हणून कार्यरत आहेत. एकंदरीत चार अधिकारी आणि 54 पोलिस कर्मचार्‍यांच्या बळावर 69 गावांची जबाबदारी या पोलिस ठाण्यांवर आहे. येथील पोलिसांची संख्या पाहता प्रत्येक गावासाठी एक पोलिस कर्मचारी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे तालुका पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

भिंगार कॅम्प पोलिस ठाणेअंतर्गत सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलिस उपनिरीक्षक व 55 कर्मचारी कार्यरत आहेत. भिंगार पोलिस ठाण्याअंतर्गत ग्रामीण भागातील दहा गावांची जबाबदारी असली, तरी भिंगार व मुकुंदनगर व सारसनगर या शहरी भागाची जबाबदारी या पोलिस ठाण्याला पार पाडावी लागते. नगर तालुक्यात तीन पोलिस ठाणे ग्रामीण भागासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या अंतर्गत नगर- औरंगाबाद महामार्ग, नगर- मनमाड, नगर- जामखेड, नगर- सोलापूर, नगर- पुणे, नगर- दौंड, नगर- कल्याण महामार्ग व अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणात जात आहेत. त्यावर होणारे अपघात, तसेच रस्ता लुट, डिझेल चोरी, असे प्रकार घडतात. त्याबद्दल शंका नाही. पण सद्यस्थितीत एकाच वेळी अनेक घटना घडत असल्याने प्रत्येक ठिकाणी पोलिसांना तत्काळ हजर होणे शक्य होत नाही. तरीही त्यांच्याकडून घटनास्थळी लवकरात लवकर पोहोचून मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येतो.

या पोलिस ठाण्याअंतर्गत येणारी काही गावे पोलिस ठाण्यापासून 50 ते 60 किलोमीटर लांब आहेत. या अंतराचा विचार करता या गावांनी काही घटना घडल्यास पोलिसांना पोहोचण्यासाठी कमीत कमी दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो. पोलिस ठाण्याअंतर्गत येणार्‍या पोलिस दुरक्षेत्रामध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. पोलिस व नागरिकांमधील दुवा म्हणून पोलिस पाटील गावपातळीवर काम पाहत असतात. परंतु, तालुक्यातील अनेक गावांनी पोलिस पाटलांच्या जागाही रिक्त आहेत.

नगर तालुका पोलिस ठाण्याअंतर्गत 69 गावे येतात. कर्मचारी संख्या त्यामानाने खूपच कमी आहे. 10 ते 12 कर्मचारी रजेवर आहेत. एकूण 42 कर्मचारी, त्यात रात्रपाळी, साप्ताहिक सुटीमुळे कर्मचार्‍यांवर मर्यादा येते. या तालुका पोलिस ठाण्याअंतर्गत अनेक डोंगराळ भाग येतो. तेथे वाहने पोहोचत नाही.
                         -राजेंद्र सानप, सहायक पोलिस निरीक्षक, नगर तालुका

एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत 31 गावे व औद्योगिक वसाहत येते. पोलिस ठाण्याची कर्मचारी संख्या कमी आहे. त्यात रस्त्यांची दुरावस्था झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले. त्याच पोलिस कर्मचार्‍यांच्या बळावर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम सुरू आहे.
                            -युवराज आठरे, सहायक पोलिस निरीक्षक, एमआयडीसी

Back to top button