नेवासा : गावगाड्यासाठी राजकीय शेकोट्या ! अनेकांना खुणावतेय गावाचे सरपंचपद | पुढारी

नेवासा : गावगाड्यासाठी राजकीय शेकोट्या ! अनेकांना खुणावतेय गावाचे सरपंचपद

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  नेवासा तालुक्यातील गुलाबी थंडीत ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमुळे राजकीय शेकोट्या पेटल्या आहेत. मतदारांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उर्जा संचारली आहे. नेवासा तालुक्यातील 13 गांवच्या ग्रामपंचायत निवडणुकीने गावपुढारी सतर्क आहेत. अनेकांना माणुसकीचा पाझर फुटला असून, स्थानिक पातळीवर आस्थेवाईकपणे विचारपूस केली जात आहे. स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीच्या हालचाली गतीमान होत आहेत. जनतेमधील सरपंचपद अनेकांना खुणावत आहे.

नेवासा तालुक्यातील पहिल्या टप्प्यात होणार्‍या 13 ग्रामपंचायत निवडणुकीचा अखेर बिगुल वाजल्याने गावपुढारी सतर्क आहेत. जनतेतून थेट सरपंचपद बहाल होणार असल्याने सत्ता काबिज करण्यासाठी राजकीय व्युहरचना आखण्यात दंग आहेत. लोकशाहीच्या निवडणुका आता ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी नेते चांगलेच दंड थोपटतांना राजकीय आखाड्यात दिसून येत आहेत. गावगाड्यातील सत्ताधारी आणि विरोधी मंडळी प्रत्येक प्रभागात आपल्या कार्यकर्त्यांमार्फत मतदारांचा कौल अजमवितांना दिसून येवू लागले असून, विरोधी मतदारांना गोड बोलून मने वळविण्याचा खुकीचा मार्ग शोधतांना दिसत आहेत.

गोड बोलून ऐकले नाही, तर मग वेगळ्या मार्गाचा अवलंब करून ‘नसतांना बला’ अंगावर आणण्याची चालही काही स्थानिकांकडून खेळली जात असल्याने या निवडणुकांनीही सध्या हिवाळ्यात राजकीय मैदान चांगले उबदार बनले आहे. उमेदवारी करिता चाचपणी होताना दिसत आहे. निवडणुकीचे वेळापत्रक जाहिर झाल्याने कमी कालावधीत गुप्त प्रचार यंत्रणा राबवून मतदारांचे मन वळविण्यासाठी आपल्या समर्थकांमार्फत प्रत्येक प्रभागात इच्छुकांनी चांगलीच फिल्डिंग लावली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या ऐकमेकांच्या खबरी घेण्यासाठी विरोधकांच्या घराजवळ आजुबाजूला वाळुतस्करांच्या खबर्‍या प्रमाणे खबरीलालही उभे करण्यात आल्याचे दिसून येत आहे. ऐकमेकांचा अंदाज इच्छुक विरोधी उमेदवार घेतांना दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया समजल्या जाणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपेक्षा ज्यादा महत्व आलेल्या सरपंचपदामुळे आता तर थेट जनतेतून सरपंचपद निवडले जाणार आहे. यामुळे नेते राजकीय जादू निवडणूक आखाड्यात उतरवितांना सध्या दिसून येत आहेत.

पार्ट्यांना सध्या हॉटेलात चांगलाच जोर

तालुक्यातील पहिल्या टप्प्यात होणार्‍या 13 गांवच्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी हंडीनिमगाव, सुरेशनगर खुपटी, चिंचबन, गोधेगाव, भेंडा खुर्द, माका, अंमळनेर, शिरेगाव, वडाळा बहिरोबा, माळीचिंचोरा, हिंगोणी, कांगोणी गावाचा समावेश आहे. गावगाड्यांची सार्वत्रिक निवडणूक महिनाभरावर आल्याने कोणी आजारी असले, तरी याची खबर इच्छूक उमेदवारांना लागत आहे. दवाखाण्यात जायला गाडी पाठवू का? अडचण आहे का? असा माणुसकीचा पाझर फुटतांना दिसत आहे. मोजक्या नेत्यांच्या रंगीत-संगीत पार्ट्यानीही सध्या हॉटेलात चांगलाच जोर धरला आहे. या निवडणुकीत जो-तो, कार्यकर्ता आता आपलीच पार्टी विजयी होण्याचे राजकीय अनुमान काढून हा निष्कर्ष आपल्या इच्छूक नेत्याला पटवून देवून चांगलीच ‘हवा’ भरतांना दिसून येत आहे.

ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम

ग्रामपंचायतीसाठी 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल, 5 डिसेंबरला छाननी होवून 7 डिसेंबरपर्यंत माघार घेण्याची मुदत, 18 डिसेंबरला मतदान, 20 डिसेंबरला मतमोजणी होईल.

Back to top button